
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
योगाचे महत्त्व हे मन, शरीर, इंद्रिय, बुद्धी व आत्मा या सर्वांचे एकरूप, एकतत्त्व होण्यात आहे. योगसाधनेतील अनेक भागांचे आपण सखोल विश्लेषण करणे अपेक्षित आहे. या लेखात आपण योगसाधनेचे मूळ समजून घेणार आहोत. ही मूळ तत्त्वे समजण्यासाठी आपण योगशास्त्रातील सूर्यनमस्कार आणि प्राणायाम हे अत्यंत सोपे तरीही महत्त्वपूर्ण प्रकार उद्धृत करणार आहोत.
===================
नियमितपणे व्यायाम केल्याने आपले शरीर निश्चितच तंदुरुस्त होते आणि आपले स्नायू अधिक बळकट होतात. मात्र आपल्या महत्त्वपूर्ण अवयवांना तंदुरुस्त ठेवण्यासाठी योगासने आणि प्राणायाम आवश्यक आहे. योग-प्राणायामाने केवळ महत्त्वपूर्ण अवयवच तंदुरुस्त राहतात असे नाही, तर त्याने मनावर नियंत्रण ठेवायलादेखील मदत होते. त्यामुळे आरोग्याच्या साधकाने योगसाधना करणे महत्त्वाचे आहे.
जसे नुसते यमक जुळवून कविता परिपूर्ण होत नाही, नुसते व्याकरण पाठ करून भाषेवर प्रभुत्व येत नाही व नुसता स्थितप्रज्ञाचा अर्थ समजून कोणी स्थितप्रज्ञ होत नाही, तसेच केवळ लवचीक अंग असणारा सर्कशीतील कसरत करणारा योगसाधनेतील पारंगत योगी होत नाही. योगसाधनेत ध्यानाची अनुभूती घेणे आवश्यक आहे. तसेच योगसाधनेची तत्त्वे तुमच्या जीवनशैलीत झिरपणे आवश्यक आहे. कारण केवळ डोळे बंद करता येऊन न हलता बसलात की ध्यान होत नाही. त्यासाठी मनावर नियंत्रण लागते. ते नियंत्रण केवळ साधनेतून येते. त्यामुळे आपण योगसाधनेतील महत्त्वाची तत्त्वे समजून घेऊ. योगासनातून केवळ लवचीकतेचे ध्येय ठेवू नका.
मुळात योगाचे महत्त्व हे मन, शरीर, इंद्रिय, बुद्धी व आत्मा या सर्वांचे एकरूप, एकतत्त्व होण्यात आहे. योगसाधनेतील अनेक भागांचे आपण सखोल विश्लेषण करणे अपेक्षित आहे. त्यात सर्वप्रथम आपण सूर्यनमस्काराकडे वळू या. योगसाधनेवर भरपूर साहित्य उपलब्ध आहे, त्यामुळे या लेखात आपण योगसाधनेचे मूळ समजून घेणार आहोत. ही मूळ तत्त्वे समजण्यासाठी आपण योगशास्त्रातील सूर्यनमस्कार आणि प्राणायाम हे अत्यंत सोपे तरीही महत्त्वपूर्ण प्रकार उद्धृत करणार आहोत.
सूर्यनमस्कार
सूर्यनमस्कार हा केवळ सामान्य व्यायामप्रकार नाही. यात एकूण 12 आसनांचा मेळ घातलेला आहे. पुढील पानावरील फोटोत दर्शवल्याप्रमाणे ती 12 आसने एका ठरावीक क्रमाने करायची आहेत. या आसनांपैकी एखादे आसन सुरुवातीला अगदी व्यवस्थित जमले नाही, तर तिथे शरीरास आवश्यकतेपेक्षा जास्त ताण न देता त्यात हळूहळू सटिकता आणायची आहे, हे आवर्जून लक्षात ठेवा. सूर्यनमस्काराच्या कोणत्या स्थितीत श्वास घ्यावा आणि कोणत्या स्थितीत सोडावा, हे ठरलेले असते. सूर्यनमस्कार घालत असताना ज्या वेळी आपली छाती आणि पोट दुमडले जाते, त्या वेळी आपला श्वास बाहेर सोडला गेला पाहिजे. तसेच ज्या वेळी छाती व पोट ताणले जातात, तेव्हा श्वास आत घेतला पाहिजे. सूर्यनमस्कार घालत असताना प्रत्येक स्थितीत श्वासावर लक्ष केंद्रित करणे आणि आपण अचूक स्थिती करत आहोत की नाही याकडे लक्ष देत प्रत्येक कृती अधिक सटिक करत जाणे अपेक्षित आहे. यात महत्त्वाचे म्हणजे श्वास व त्यावर एकाग्र झालेले मन.
आसन येणे यापेक्षा त्यात एकाग्र होणे व श्वसनावर नियंत्रित स्थिर शरीर व शांत मन राहणे हे महत्त्वाचे आहे. श्वसन खोलवर जाणारे हवे. एका आसनातून दुसर्या आसनात शिरताना श्वास नियमित व संथ सुरू असला पाहिजे. त्यात नियमितता पाहिजे. शरीराला हिसके देऊ नयेत. श्वसनावर लक्ष ठेवल्याने मन अंतर्मुख होण्यास मदत होते. त्यापलीकडील स्थिती म्हणजे प्रत्येक आसनात लागणारे ध्यान. होय, योगासनांचा मूळ आधार ध्यान हा आहे. प्रत्येक आसनात तुमची एकाग्रता साधून ध्यान लागलेच पाहिजे. एकूण संपूर्ण शरीरात ऊर्जेचा संचार होत आहे हे सत्य उपजले व उमजले पाहिजे. ती ऊर्जा हा प्राण आहे. ती ऊर्जा आत्मरूप चैतन्य आहे
योगसाधनेचे खरे ध्येय कोऽऽहम्? प्रश्नाचे उत्तर शोधत मुक्तीच्या दिशेने वाटचाल करणे हे आहे. त्यासाठी निरोगी शरीर व प्रसन्न तसेच नियंत्रित मन ही पूर्वतयारी हवी. म्हणून हा आसनांचा तसेच प्राणायामाचा विस्तार मांडलेला आहे. एकदा ध्येय लक्षात आले की आपण आसनाचा, तसेच प्राणायामाचा योग्य विनियोग कराल. परंतु जर तुम्ही श्वसनावर लक्ष एकाग्र न करता नुसत्या शारीरिक हालचालींचा प्रयत्न केला व तुमचे ध्यान शरीरावर, श्वासावर नसेल, तर तो व्यायाम होतो, योग नाही. व्यायाम व योगसाधना यातला हा मूलभूत फरक आहे. या फरकामुळेच योग व्हायटल ऑर्गन्सपर्यंत जातो. त्यामुळे मानसिक आरोग्य सुधारते. रिफ्लेक्सेस शार्प होतात. व्यायामापेक्षा योग का श्रेष्ठ आहे, हे तुम्हाला आता समजले असेल.
सूर्यनमस्कारातील प्रत्येक आसन व हालचाल ही सांध्यांच्या हालचालीशी निगडित आहे. एका किंवा अनेक सांध्यांच्या विशिष्ट स्थिती सलग करणे आणि त्या करत असताना श्वासाचे नियमन करत अंतर्मुख होणे अशी सूर्यनमस्काराची संक्षिप्त व्याख्या करता येईल. सूर्यनमस्कार घालत असताना प्रत्येक सांध्यांना त्या त्या विशिष्ट स्थितीत बळकटी येते. तसेच छोट्या मेंदूला (लशीशलशश्रर्श्रीाला) शरीराचे संतुलन राखण्याचा सराव होतो, सूर्यनमस्कारात त्याला चांगली चालना मिळते. छोट्या मेंदूसाठी हा खूप उपयुक्त आसन प्रकार आहे. योगसाधनेत मेंदूचा हा भाग कृतिशील होतो. सूर्यनमस्कारामुळे झोक जाण्याचे प्रमाण कमी होते. सूर्यनमस्कारामुळे विविध हालचाली करताना शरीर संतुलित राहते. हा फरक तुम्हाला छोट्या छोट्या बाबींमध्ये दिसून येईल. उदाहरणार्थ, अनेक जणांना खाली वाकल्यावर कंबर, पाठ या भागांत कळ येते. सूर्यनमस्कारामुळे ही कळ येणे बंद होईल अथवा तिचे प्रमाण नक्कीच कमी होईल.
सूर्यनमस्कारामुळे सांध्यांना बळकटी आल्याने हा बदल घडून येतो. इतकेच नव्हे, तर सांध्यांच्या सभोवताली असणारे स्नायूदेखील बळकट होऊन सांध्यांवरील दबाव कमी होतो. सूर्यनमस्कारातून मिळणारी बळकटी अनेक प्रकाराच्या सांधेदुखी किंवा गुडघेदुखी यांचा नायनाट करू शकते. त्याचे मुख्य कारण सूर्यनमस्कारातून सांध्यांच्या भोवतीच्या स्नायूंना मिळणारी बळकटी हे आहे. जर स्नायू सांध्यांना योग्य आधार देत असतील, तर सांध्यांवरील ताण आपोआप कमी होईल, पर्यायाने सांध्यांचे दुखणे कमी होईल.
सर्वत्र, सूर्यनमस्कार स्थितीतील थोड्याफार फरकाने सारखेच सूर्यनमस्कार घातले आणि शिकवले जातात. त्यामुळे कोणते योग्य आणि कोणते अयोग्य या तपशिलात न जाता त्याचा मूळ हेतू समजून घेऊ या. योगशास्त्राची पार्श्वभूमी समजून घेऊन सूर्यनमस्काराकडे आणि इतरही योगासनांकडे पाहणे हितकारक ठरेल. आपल्याला मूळ योगशास्त्राच्या निर्णायक फायद्यांमध्ये (ध्यान, एकाग्रता, साधना यांमध्ये) रस असल्यामुळे आपण योगसाधनेकडे केवळ शारीरिक मेहनत म्हणून न पाहता साधना म्हणून पाहायला हवे. बाजूच्या फोटोत सूर्यनमस्काराच्या स्थिती आणि त्यांना अनुसरून श्वसनक्रिया कशी व्हायला हवी, हे दाखवले आहे.