
दैनिक चालू वार्ता कंधार प्रतिनिधी -बाजीराव गायकवाड
कंधार:- बाधीत परिसरामध्ये स्वच्छता व निर्जंतूक द्रावणाची फवारणी, रोग प्रसारास कारणीभूत असलेल्या डास, माश्या, गोचीड इत्यादीच्या नियंत्रणासाठी औषधांची फवारणी, लम्पी स्किन रोगांचा प्रादुर्भाव व प्रसार थांबविण्यासाठी नांदेड जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती, नगरपरिषद, नगरपंचायत व महानगरपालिका यांचेमार्फत त्यांचे कार्यक्षेत्रातील भटक्या पशुधनाचे नियमित निरीक्षण करण्यात यावे. तसेच बाधीत पशुधनाची काळजी घ्यावी असे सांगितले आहे. कायद्याशी सुसंगत कृती न करणाऱ्या आणि कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये अडथळा निर्माण करणाऱ्या पशुपालक, व्यक्ती, संस्था प्रतिनिधी यांचेविरुध्द नियमानुसार गुन्हा दाखल करणे. तसेच कार्यवाही प्रस्तावित करण्यासाठी त्या-त्या क्षेत्रातील पशुधन विकास अधिकारी यांना प्राधिकृत करण्यात आले आहे. सर्व खाजगी पदविकाधारकांनी / पशुपालकांनी लम्पी स्किन रोगांची माहिती शासकीय पशुवैद्यकीय संस्थेस देणे बंधनकारक आहे. लम्पी स्किन रोगाचा उपचार पशुधन विकास अधिकारी किंवा त्यांचे मार्गदर्शनानुसार करण्यात यावा. खाजगी पदविकाधारकांनी लम्पी स्किन रोगांचा परस्पर उपचार केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. नांदेड जिल्ह्यातील सर्व पशुवैद्यकीय संस्थांनी लम्पी स्किन रोगांच्या उपचारासाठी आवश्यक सर्व औषधी वरिष्ठांशी चर्चा करुन उपलब्ध करुन घ्याव्यात, असेही आदेशात जिल्हाधिकारी खुशालसिंह परेदशी यांनी स्पष्ट केले आहे