
दैनिक चालू वार्ता उपसंपादक परभणी- दत्तात्रय वामनराव कराळे
“””””””””””””””””””””””””””””””””””””””””””
परभणी : राज्यात गद्दारी करुन सत्तेवर आलेलं शिंदे सरकार जास्त काळ टिकणार नाही तर ते लवकरच गडगडले जाऊन मध्यावधी निवडणुका लागल्या जातील, असं भाकित आमदार तथा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केले आहे.
जयंत पाटील हे नुकताच परभणीत आले होते. शहर व ग्रामीण राष्ट्रवादी कार्यकारिणीची आढावा बैठक, पक्षबांधणी आणि कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्याशी संवाद या कार्यक्रमासाठी त्यांनी उपस्थिती लावली होती.
जिल्हा कार्यकारिणी अध्यक्ष प्रतापराव देशमुख यांच्या कार्य अहवाल पडताळणी नंतर समाधान व्यक्त केले असून अधिक प्रगतीपर कार्यासाठी श्री पाटील यांनी प्रतापराव देशमुख यांना काही मौलीक सल्लाही दिल्याचे समजते. असं असलं तरी पक्ष कार्यकर्त्यांना निसटता विजय बघायचा नसेल तर अधिक मेहनत करणे गरजेचे आहे, असेही सूचित केले. स्पर्धात्मक युगात टिकण्यासाठी प्रत्येकाला मोठ्या कष्टाची गरज असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये एकहाती सत्ता मिळवायची असेल तर अधिकाधिक सभासद नोंदणी करणे ही महत्वाकांक्षी योजना घेऊन प्रत्येकाने जोमाने कामाला लागणे गरजेचे असल्याचेही पाटील यांनी सांगितले.
याप्रसंगी पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा विधानपरिषदेचे आमदार बाबाजानी दुर्रानी, माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे, माजी आमदार विजय गव्हाणे, माजी जिल्हाध्यक्ष राजेश विटेकर यांचेसह अनेक मान्यवर उपस्थित होते.