
दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी -श्रीकांत नाथे
अमरावती :- महाराष्ट्र जिवन प्राधीकरणाची अभय योजना सुरू असली तरी या योजनेचा लाभ घेण्याचीही कुवत महापालिकेत नाही.मनपाच्या तिजोरीत खडखडात असल्याने मुद्दल भरण्याचीही ऐपत नसल्याने आयुक्तांनी शासनाला एकमुस्त निधी देण्याची विनंती केली आहे.३० सप्टेंबरला योजनेची मुदत संपत आहे.
शहराला करण्यात येणाऱ्या पाणीपट्टी व मलशुद्धीकरणाची देखरेख यावरील खर्चापायी मजीप्राला महापालिकेकडून ६२ कोटी रुपये घेणे आहे.ही रक्कम वेळेत न भरल्याने मजिप्राने त्यावर ७६ कोटी रूपये दंड आकारणी केली आहे.एकूण १३८ कोटी रूपये महापालिकेस मजिप्राला देणे आहे.मुद्दल व त्यावरील दंड असे १३८ कोटी रूपये थकीत असून ‘ मुद्दल भरण्यासाठी महापालिकेकडे मात्र पैसे नाहीत.मजिप्राने त्यांच्या ग्राहकांसाठी अभय योजना जाहीर केली असून मूळ देयक भरल्यास त्यावर लावण्यात आलेला अधिभार माफ करण्यात येणार आहे.३० सप्टेंबर ही अंतिम मुद्त असून या मुदतीत जे ग्राहक मूळ देयक भरतील त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.तिजोरीत खणखणाट असल्याने मनपाला मूळ देयक भरता आलेले नाही.पाणी पुरवठा ही अत्यावश्यक बाब असल्याने मजिप्रालाही पाणीपुरवठा खंडित करता आलेला नाही.सोबतच देयकही वसूल करता आलेले नाही.पैसेच नसल्याने या योजनेचा लाभ मनपाला मिळणे अशक्य असल्याचे स्पष्ट झाले आहे.दरम्यान देयक भरण्यासाठी शासनाने मदत करावी यासाठी मनपा आयुक्त डॉ.प्रवीण आष्टीकर यांनी शासनाकडे विनंती केली आहे.