
दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती :- स्थानिक नवसारी परिसरात ५० लाखांच्या निधीतून अभ्यसिका बांधण्यात येणार असून,त्याचे भूमिपूजन आमदार सुलभा खोडके यांच्या हस्ते करण्यात आले.यानिमित्त आयोजित मार्गदर्शन शिबिरात नितेश कराळे (गुरुजी) यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मूलभूत मंत्र शिकवतांना बहुजनांच्या मुलांना नोकरी,राजकारण,न्यायव्यवस्थेत सामावून घेतले पाहिजे,असा मुलमंत्र त्यांनी शिकवला.
शहर व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी नवसारी कॅम्पसमध्ये अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज अभ्यासिका इमारत बांधण्यात येईल.त्याठिकाणी पुस्तकांसोबत संगणक व इतर सुविधा उपलब्ध केल्या जातील.एकाचवेळेस त्याठिकाणी सुमारे १०० विद्यार्थी अभ्यास करतील.सध्याच्या परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांसाठी सुविधांची कमतरता भासत असल्यामुळे सुसज्ज खेळ अभ्यासिका बांधण्याची इच्छा आमदार सुलभाताई खोडके यांनी व्यक्त केली तसेच खेळांडूसाठी सुध्दा प्रयत्नशील असल्याचे आश्वासन यावेळी त्यांनी दिले.नवसारी-व्हीएमव्ही मार्गावरील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले चौकपासून सटे क्रीडा संकुलजवळ सुसज्ज अभ्यासिकेचे सुद्धा निर्माण केले जाईल ज्याचे भूमिपूजन केले.
यावेळी आमदार सुलभा खोडके यांच्यासह राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष,प्रवक्ते संजय खोडके,वर्धा येथील फिनिक्स स्पर्धा परीक्षा अकॅडमीचे संचालक व मार्गदर्शक नितेश कराळे,राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत डवरे,माजी महापौर ऍड.किशोर शेळके,माजी नगरसेवक रतन डेंडुले,मंजुश्री महल्ले,निलिमा काळे,प्रशांत महल्ले,छाया कथिलकर इत्यादी यावेळी उपस्थित होते.तसेच प्रशांत डवरे,सुयोग तायडे,प्रज्वल घोम,राजेंद्र टाके,रवी अढाऊ,शैलेश अमृते आणि त्यांच्या सहकाऱ्यांतर्फे मान्यवरांना पुष्पगुच्छ व स्मृतीचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. भूमीपूजन कार्यक्रम नंतर नितेश कराळे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाचे संचालन प्रा.संदीप जुनघरे आणि आभार प्रदर्शन प्रशांत डवरे यांनी केले.