
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
पुणे : पुण्याच्या पश्चिम भागातील चांदणी चौकातील पूल पाडण्याचं काम नियोजनाप्रमाणं पूर्ण झाल्याचा दावा कंपनीच्या मुख्य इंजिनिअर आनंद शर्मा यांनी केला आहे. त्यामुळं हा पूल पडल्याचं अधिकृतरित्या जाहीर करण्यात आलं आहे.
यानंतर आता पूलाच्या बाजूचा राडारोडा पोकलेनंच्या बाजूनं दूर केला जात आहे. हा संपूर्ण राडारोडा दूर करायला आणखी चार-पाच तास लागतील अशी माहिती त्यांनी दिली.
हा ३० मीटर लांबीचा पूल पाडण्याचं काम एडिफाईज कंपनीला देण्यात आलं आहे. या कंपनीचे मुख्य अभियंता आनंद शर्मा म्हणाले, “जिथं जिथं आम्ही स्फोटकं लावली होती, त्या ठिकाणांहून पूलाचं स्ट्रक्चर जमीनदोस्त झालं आहे. यामधील स्टीलचे रॉड आहेत ते खाली आले आहेत. पूलाच्या मधला एक खांबाचा देखील स्फोट झाला आहे पण तो अद्याप खाली आलेला नाही. जेव्हा या खांबाचं कॉंक्रीट दूर केलं जाईल तेव्हा तो पूर्णपणे खाली कोसळेल. या पूलामध्ये स्टील जास्त असल्यानं आणि बांधकामावेळी दोन्ही बाजूनं हे स्टील दगडांमध्ये फिक्स करण्यात आल्यानं पूलाचा भाग पूर्णपणे पडला नाही. पण जसा स्फोटं होणं अपेक्षित होतं तसं सर्वकाही झालेलं आहे”
जे मोठं स्ट्रक्चर असतं त्यामध्ये एक्स्प्लोजन अर्थात मोठा स्फोट केला जातो पण हा कमी तीव्रतेचा स्फोट आहे, याला ब्लास्टिंग म्हणतात. ब्लास्टिंगमध्ये कॉंक्रीट हटवलं जातं, स्टीलच्या फ्रेमवर हे कॉंक्रीट ठेवण्यात आलं आहे. यापुढे चार ते पाच तासांत हे संपूर्ण स्ट्रक्चर पोकलेनच्या मदतीनं खाली घेतलं जाईल, अशी सविस्तर माहिती शर्मा यांनी दिली.
जसं हवं तसा स्फोट झाला आहे पण यामध्ये आमच्या अंदाजापेक्षा जास्त प्रमाणात स्टील आहे. तसेच त्याचं स्टील हे दगडावर फिक्स करण्यात आलं आहे. त्यामुळं थोड्यावेळातच ते देखील काही पडून जाईल. तसेच यामध्ये दुसऱ्या ब्लास्टची गरज नाही. यामध्ये जे १३०० स्फोटकं लावण्यात आले होते, ते सर्व ब्लास्ट झालेले नाहीत. त्याची आम्ही तपासणी करणार आहोत. एनडीएच्या बाजूला काही होल मिस झाले आहेत. पूलाचं स्ट्रक्चर आता पोकलेनच्या सहाय्यानं पूर्णपणे पाडण्यात येईल, असंही आनंद शर्मा यांनी स्पष्ट केलं आहे.