
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
मुंबई : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा आणि निर्णायक सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळला गेला.
भारतीय संघाने हा सामना 8 विकेटने जिंकून मालिका 2-1 अशी खिशात घातली. गोलंदाजीत कुलदीप यादव आणि फलंदाजीत शुभमन गिल भारतासाठी सामन्याचे हिरो ठरले. कुलदीपने 4 बळी घेतले, तर गिलने 49 धावांची खेळी खेळली.
या सामन्यात भारताचा कर्णधार शिखर धवनने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. दक्षिण आफ्रिकेच्या संघाला प्रथम फलंदाजी करावी लागली आणि संघ 99 धावांत गारद झाला. अशा प्रकारे भारताला सामना आणि मालिका जिंकण्यासाठी 100 धावा करायच्या होत्या. भारताकडून कुलदीप यादवने 4 तर मोहम्मद सिराज, वॉशिंग्टन सुंदर आणि शाहबाज अहमद यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले. दक्षिण आफ्रिकेकडून हेनरिक क्लासेनने 34 धावा केल्या.
लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाने शिखर धवनची 8 धावा करत लवकर विकेट गमावली. शिखर धवन धावबाद झाला. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात स्फोटक खेळी करणाऱ्या इशान किशनलाही मोठी खेळी करता आली नाही तो 10 धावा करत तंबूत परतला. मात्र दुसऱ्या टोकाला उभ्या असलेल्या शुभमन गिलने चांगली फलंदाजी केली. शुभमन गिलने श्रेयस अय्यरसोबत 39 धावांची भागीदारी करून संघाचा विजय निश्चित केला. शुभमन गिलचे अर्धशतक हुकले आणि तो 49 धावांवर बाद झाला. भारतीय संघाने 19.1 षटकात सामना जिंकला. श्रेयस अय्यरने 23 चेंडूत 28 आणि संजू सॅमसनने दोन धावा केल्या.