
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
मुंबई : भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या आज (११ ऑक्टोबर) २९ वर्षांचा झाला.
हार्दिकचा हा वाढदिवस त्याचा मुलगा अगस्त्याने आणखी खास बनवला. दोन वर्षांच्या अगस्त्याने वडिलांना अशी भेट दिली, जी हार्दिक कधीही विसरणार नाही. स्वत: हार्दिकनेच याबद्दल सांगितले आहे. सध्या हार्दिक पांड्या टी-२० वर्ल्ड कपसाठी ऑस्ट्रेलियात टीम इंडियासोबत आहे. त्याचे कुटुंब त्याच्यासोबत नाही. यामुळेच हार्दिकला आपली पत्नी नताशा आणि मुलाची आठवण येत आहे. हार्दिकने यापूर्वी पत्नीसाठी एक पोस्ट शेअर केली होती. पण आता त्याने मुलासाठी एक व्हिडिओ शेअर केला आहे.
हार्दिकने एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये अगस्त्य त्याला बॅट देताना दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करत हार्दिकने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘माझ्या वाढदिवसानिमित्त मी माझ्या मुलाला सर्वात जास्त मिस करतोय. मला त्याची खूपच आठवण येत आहे. मला आतापर्यंत मिळालेली ही सर्वोत्तम भेट आहे, असे त्याने लिहिले आहे. हार्दिक जेव्हा टी२० वर्ल्डकपसाठी बॅट्सवर स्टीकर लावत होता, त्यावेळी अगस्त्य त्याला एक-एक बॅट आणून देत होता. त्यावेळचा हा व्हिडीओ त्याने पोस्ट केला आहे. हार्दिकची पत्नी नताशानेही या पोस्टवर कमेंट करत हार्ट इमोजी पोस्ट केली आहे.