
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी- प्रदिप मडावी
कोरपना तालुक्यात २५ ग्रामपंचायतीच्या निवडणुका येत्या १६ तारखेला होणार असून एकूण ४६४ उमेदवार आपले नशीब आजमावत आहे. यावेळी थेट सरपंच निवडणूक असल्याने सर्वार्थाने राजकीय समीकरण वेगळे ठरणार आहे. सरपंच पदाच्या २५ जागांसाठी ७४ उमेदवार रिंगणात उतरले आहे.
वनसडी, वडगाव, बिबी, नांदा, उपरवाही, पारडी, बेलगाव, रुपापेठ, दुर्गाडी, चनई, थुट्रा, पिपर्डा, कान्हाळगाव, कातलाबोडी, धनोली, सोणूर्ली, मांगलहिरा, कोठोडा, पिंपळगाव, खीर्डी, खैरगाव, परसोडा, सावरहिरा, मांडवा, लखमापूर या गावात निवडणुका होणार आहे. ही निवडणुक राजकीय पक्षांच्या चिन्हांवर लढली जात नसली तरी राजकीय पक्षांचे नेते आपल्या पॅनलचा उमेदवार सरपंचपदावर निवडून यावा याकरिता स्थानिक आजी माजी आमदार, जिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख यासह अनेक नेते मंडळींचे गावागावात लक्ष असून राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे.
तालुक्यातील औद्योगिक वसाहत, श्रीमंत, सर्वाधिक लोकसंख्या व १७ सदस्य असलेली मोठी ग्रामपंचात नांदा ही आहे.
येथील सरपंचपद अनुसूचित जमाती स्त्रीसाठी राखीव असून या ठिकाणी सरपंच पदासाठी दुहेरी लढत होणार आहे. यासोबत बिबी, दुर्गाडी, कोठोडा, वनसडी, रुपापेठ, पिंपळगाव, लखमापूर, सावरहिरा, पारडी येथेही सरपंच पदासाठी दुहेरी लढत होणार आहे.
वडगाव, चनई, कान्हाळगाव, कातलाबुडी, धानोली, मांगलहिरा, परसोडा येथे तिरंगी लढत, उपरवाही, पिपर्डा, बेलगाव, खीर्डी, मांडवा येथे चौरंगी लढत तर खैरगाव, सोनुर्ली येथे सरपंच पदाकरीता पंचरंगी सामना होईल.
निवडणूक प्रचारास सुरुवात झाली. प्रचार कार्यालये सुरू करून कार्यकर्त्यांना एकत्रित करून डोअर टू डोअर प्रचार करताना उमेदवारासह नेते मंडळीं दिसून येत आहे. गावातील चौकाचौकात निवडणूक चर्चेला उधाण आले आहे.
या निवडणुकीत भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेतकरी संघटना, मनसे ,शिवसेना, गोंडवाना आदी पक्षांनी आपले उमेवार निवडणुकीत उतरविले आहे. अनेक ठिकाणी अभद्र युती झाल्याने नवीन समिकरणे जुळून येत आहे.