
दैनिक चालू वार्ता जव्हार प्रतिनिधी -दिपक काकरा.
जव्हार:-आज साजरी होणारी वाघबारस या दिवसापासून आदिवासी बांधवांची दिवाळी सुरू झाली असून आदिवासी बांधव हे वाघदेवतेच्या पूजनाने दिवाळी निमित्ताने गावसीमेवर गावोगावी वाघदेवाची पूजा करतात.आदिवासी समाज हा निसर्ग पूजक असून या बांधवांची शेती ही पूर्णतः निसर्गावरच अवलंबून असते.जल,जंगल,जमीन यावरच आदिवासी समाज पिढ्यानपिढ्या आपला हक्क सांगत आला आहे.त्यामुळे आदिवासी समाजाच्या जीवनातील पावन दिवस म्हणून आजच्या वाघबारसीला मोठे महत्त्व आहे.
या समाजातील बांधव हे आपल्याला मिळेल त्या संपत्तीवर समाधान मानून जगतो.त्यामुळे लक्ष्मी पूजन म्हणजेच आपली निसर्ग संपत्तीचे पूजन करतात.वाघदेवतेच्या मूर्तीवर चंद्र,सूर्य,वाघदेव,नागदेव व मोर या सारखी चित्रे कोरलेली असतात.वाघदेवाला याच दिवशी शेंदूर लावून खेडोपाड्यात लहान मुले हाती लाकडी तलवार घेऊन त्यावर वाघदेवाचे चित्रे रंगवून गावभर तांदळाचे मागणे मागत अगदी आनंदाने फिरताना दिसून येतात आणि संध्याकाळी एकत्रच जेवण बनवून ही लहान मुले जेवण करतात.