
दैनिक चालू वार्ता वृत्तसेवा-
धाराशिव ( उस्मानाबाद):- आमदार कैलास पाटील यांनी धाराशिव जिल्हयातील शेतकऱ्यांच्या हक्काचा पीकविमा, अनुदान आणि ओला दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरु केलेल्या आमरण उपोषणच्या पाचव्या दिवशी सुरूच आहे. आमदार पाटील यांनी दिवाळीच्या पहिल्याच दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरु केले. दररोज त्यांना मिळणारा पाठींबा देखील वाढत आहे. मात्र दुसऱ्या बाजुला त्यांची प्रकृती खालावत चालल्याचे वैद्यकीय अधिकारी यानी सांगितले आहे. त्यामुळे सरकारने आता शेतकऱ्यांच्या संयमाचा अंत पाहु नये, असा इशारा देखील दिला आहे.जिल्ह्यात सतत होणाऱ्या अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले आहे. शिवाय सततच्या पावसाने उरल्या सुरल्या पिकांनाही विविध रोगाने ग्रासले आहे. या परिस्थितीत शेतकरी अडचणीत आला असून, दोन वर्षापूर्वी शेतकऱयांच्या हक्काचा पीकविमा आणि नुकसान भरपाई त्वरीत द्यावी. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर २०२० मधील पिकविम्याची ५३१ कोटी रुपये जिल्हयातील तीन लाख ५७ हजार पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात तीन आठवडयात जमा करण्याचे बंधन होते, असे असतानाही अदयापपर्यंत पीकविमा जमा झाला नाही. उस्मानाबादचे जिल्हाधिकारी सचिन ओंबासे यांनी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली आहे.जिल्हाधिकारी ओंबासे यांनी सांगितलं की, खरीप 2020 मधील 541 कोटीची मागणी होती. पैकी कंपनीने तत्काळ 200 कोटी जमा केले आहेत. विमा कंपनीने 341 कोटी रक्कम दिलेली नाही. त्यामुळे कंपनी विरुद्ध कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. खात्यात जमा झालेली रक्कम आठ ते दहा दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करणार आहोत.