दैनिक चालु वार्ता औरंगाबाद उपसंपादक -मोहन आखाडे
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर औरंगाबदेत एकमेकांचे खास कार्यकर्ते फोडण्याची चुरस पाहायला मिळत आहे. मनसेच्या विद्यार्थी सेनेचे माजी जिल्हाध्यक्ष अमोल खडसे, विरोधी पक्ष नेते अंबादास दानवेंचे खंदे समर्थक विश्वनाथ राजपूत (माजी नगरसेविका प्राजक्ता राजपूत यांचे पती ) आणि ठाकरे गटातील काही शिवसेना पदाधिकाऱ्यांना औरंगाबाद मध्य मतदारसंघाचे शिंदे गटातील आमदार प्रदीप जैस्वाल यांनी गळाला लावलं.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईत या पदाधिकाऱ्यांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला. यामुळे आगामी औरंगाबाद महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फोडाफोडीच्या राजकारणाला स्थानिक पातळीवर सुरुवात झाल्याची जोरदार चर्चा रंगली आहे.आता शिंदे गटातील आमदार प्रदीप जैस्वाल यांनी अंबादास दानवे यांच्या विश्वासातील मानल्या जाणाऱ्या विश्वनाथ राजपूत यांना गळाला लावत शिंदे गटात सामील केले आहे.
मनपा निवडणुकीच्या तोंडावर जैस्वाल यांनी खेळलेली खेळी महत्त्वाची मानली जात असून अनेक दिवसांपासून मनसेच्या कार्यक्रमाला दांडी मारणारे मनविसेचे माजी जिल्हाध्यक्ष अमोल खडसे यांनी देखील त्यांच्या कार्यकर्त्यांसह जैस्वाल यांच्या नेतृत्वात शिंदे गटात प्रवेश केला आहे. जैस्वाल यांनी सुरु केलेल्या फोडाफोडीच्या राजकारणाला आता अंबादास दानवे कसे उत्तर देणार, याचीच चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
