
दैनिक चालू वार्ता उपसंपादक परभणी- दत्तात्रय वामनराव कराळे
परभणी : मराठी पत्रकारितेचे आद्य जनक, आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे स्मारक उभारुन परभणी जिल्ह्यातील समस्त पत्रकार बांधवांसाठी त्यांचा आदर्श व शिकवण स्मारकाच्या माध्यमातून सतत तेवत ठेवणे गरजेचे आहे. कार्यरत गट आणि तट विभिन्न असले तरी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची शिकवण एक आदर्श समजून गटा-तटातील सर्व पत्रकार बांधवांच्या बौध्दिक विकासासाठी एकोपा साधणे, विविध स्पर्धा, खेळ व कार्यक्रम आयोजित करणे, पत्रकारितेतील नामांकित निमंत्रित मान्यवरांच्या हस्ते व उपस्थितीत पत्रकारांच्या शौर्यपूर्ण कार्याचे कौतुक करणे, पुरस्कार, प्रशस्तीपत्र प्रदान करणे अत्यंत आवश्यक असणार आहे. पत्रकारांसाठी विमा कवच मिळवणे, वर्षातून एकदा तरी पत्रकारांची कार्यशाळा भरविणे,
परभणीच्या ऐतिहासिक, सांस्कृतिक व धार्मिक परंपरेचा ठेवा जतन करणे शक्य व्हावे यासाठी क्रिकेटसह विविध स्पर्धांचे आयोजन करुन बौध्दिक विकासाबरोबरच कला, गुण व खिलाडू वृत्तीला चालना देणे या व अशा नानाविध उपक्रमांचा राबता राबवता यावा, ही मनस्वी इच्छा असून ती मूर्तरुपात साकार करणे गरजेचे आहे. अध्यक्षपदाची धुरा सांभाळणारे राजकुमार हट्टेकरांसह संपूर्ण कार्यकारिणीला या निमित्ताने माझे आर्जव राहाणार आहे.
नुकताच घोषित जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या कार्यकारिणीला भावी कार्यासाठी सुयश व्यक्त करुन त्यांचे अभिनंदन करणे हे क्रमप्राप्तच ठरणार आहे. पत्रकार व पत्रकार संघाच्या कल्याणासाठी झोकून देणाऱ्या इच्छूक पत्रकारांना कार्य करण्याची संधी उपलब्ध करून देणे ही काळाची गरज ठरणार असल्याचे मत ज्येष्ठ पत्रकार तथा दैनिक चालू वार्ता या मराठी दैनिकाचे परभणी जिल्हा उपसंपादक दत्तात्रय वामनराव कराळे यांनी व्यक्त केले आहे.