
दैनिक चालू वार्ता वृत्तसेवा –
सरपंचांची होणार थेट निवड
१८ डिसेंबरला मतदान तर
२० डिसेंबरला होणार
मतमोजणी
आजपासूनच आचारसंहिता
“”””””””””””””””””””'””””””””””””””””””””””’
परभणी : परभणी जिल्ह्यातील एकूण १२८ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा बिगूल वाजला आहे. १८ डिसेंबर २०२२ ला होणाऱ्या या निवडणूकीची आजपासूनच आचारसंहिता लागू झाली आहे. सर्वच्या सर्व म्हणजेच १२८ ग्रामपंचायतींच्या सरपंचांची थेट निवड केली जाणार आहे. अशी माहिती राज्याचे निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी काल मुंबईत दिली आहे.
मुंबईतील अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीचा धुरळा खाली बसतोय न बसतोय तोच निवडणूक आयुक्तांनी राज्यभरातील एकूण ७७५१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा करुन जो बिगूल वाजवला आहे त्यामुळे आता परभणीत ही मोठ्या प्रमाणात राजकीय कसोटीचा धुरळा उडला जाणार आहे. २८ नोव्हेंबर ते ०२ डिसेंबर २०२२ या कालावधीत नामनिर्देशन पत्र दाखल करता येतील. नामनिर्देशन पत्रांची छानणी ०५ डिसेंबर २०२२ तर ते मागे घेण्याची अंतिम मुदत ०७ डिसेंबर २०२२ दुपारी ०३ वाजेपर्यंत राहणार आहे. त्याच दिवशी चिन्हांचे वाटप केले जाणार आहे. मतदानाची वेळ सकाळी साडेसात वाजे पासून ते संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत राहणार आहे.
परभणी शहरासह ग्रामीण भागातही उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेचा जोर असल्याचे चित्र आहे. राज्यात शिवसेना, कॉंग्रेस व राष्ट्रवादीची महाविकास आघाडी कार्यरत असली तरी परभणी जिल्ह्यातील घोषित ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत ही आघाडी राहील का नाही, हे लवकरच दिसून येणार आहे. त्यातच सत्तांतर झाल्यानंतर परभणी जिल्ह्यात शिंदे गटाची ताकद कितपत आहे, याचेही चित्र स्पष्ट होणार आहे. शिवसेना खासदार संजय जाधव व आमदार राहूल पाटील यांचे बऱ्यापैकी वर्चस्व असल्याने याही निवडणुकीत चांगलीच रंगत येणार असल्याचे बोलले जात आहे.