
दैनिक चालू वार्ता जव्हार प्रतिनिधी-दिपक काकरा.
कमी वेळ व कमी कष्टात जास्त नफा देणारी पिके
जव्हार:- जव्हार तालुक्यातील आदिवासी आणि ग्रामीण भागात आधुनिक तंत्रज्ञान वापरून अत्याधुनिक साधने आणि सुधारित वाणाचे बी-बियाणे यांचा वापर करून या भागातील शेतकरी भाजीपाला लागवडीकडे वळायला लागल्याने कमी वेळ व कमी कष्टात जास्त नफा देणारी पिके असल्याने भाजीपाला लागवडीतून शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ मिळून शेतकऱ्यांची आर्थिक पत सुधारण्यास मदत मिळत आहे.
तालुक्यात भात कापणी अंतिम टप्प्यात असून आता तालुक्यातील शेतकरी रब्बी पिकांच्या दिशेने वळला असू भाजीपाला लागवड ते वालाच्या शेतीच्या लागवडीला मोठ्या प्रमाणात लागल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.लागवड करणाऱ्या भागात नांगरणी व तंत्रज्ञानाचाही वापर होत आहे.
तालुक्यातील वनवासी,पिंपळशेत,हाडे,खरोंडा, डेंगाचीमेट,साकुर आदी.भागात भाजीपाला लागवड होते.त्यात वालाच्या शेतीत वाल,चवळी,कारली,मिरची,तूर,हरभरा अशा पिकांची तसेच वांगी, मुळा,गवार,टमाटर व पालक अशा भाजीपाल्याची लागवड शेतकरी करत आहेत.या लागवडी करताना शेतकरीवर्ग तालुका कृषी अधिकारी व तालुक्यातील सामजिक संस्थांचा कृषी तज्ञांचा सल्ला घेऊन लागवड करीत असून यासाठी शासनाच्या योजनाचा लाभ घेत आहेत.तालुक्यातील पाणी व्यवस्था असणाऱ्या काही शेतकऱ्यांशी संवाद साधला असता ते म्हणाले की शेतामध्ये आता पाण्याचा चांगला ओलावा असून सध्या पेरणी केल्याने भाजी पाल्याची रोपे चांगली वाढून योग्य वेळी भाजीपाला तयार होऊन मालाला मागणी मिळून भाव चांगल्या प्रकारे मिळेल व फायदा होईल.
भाजीपाला पीक व्यवस्थापन
योग्य नियोजन आणि काळजी तसेच रोगप्रतिबंधक औषधांची वेळेवर फवारणी करून घेतल्यास भाजीपाल्यातून कमी वेळात जास्त नफा मिळतो. तालुक्यातील शेतक-यांनी व्यावसायिक दृष्टिकोनातून बाजारातील उपलब्धता आणि मागणी यानुसार नियोजन करून भाजीपाला पिकवल्यास हा व्यवसाय आर्थिकदृष्ट्या अधिक फायदेशीर ठरू शकतो.असे तालुका कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे.
दैनंदिन आहारात विशेष महत्त्व
माणसाच्या दैनंदिन आहारामध्ये भाजीपाल्याला विशेष महत्त्व आहे.मानवी शरीराला प्रथिने,कर्बोदके याचबरोबर जीवनसत्वे,खनिजे व तंतुमय पदार्थ यांचीही आवश्यकता असते.हे घटक भाजीपाल्याद्वारे पुरवले जाऊ शकतात.म्हणून जव्हार शहरात सकाळी ९ वाजेपर्यंत ग्रामीण भागातून स्वच्छ आण,सेंद्रिय खते वापरून तयार केलेला ताजा भाजीपाला दाखल होत असून अवघ्या तासाभरात भाजीपाला विक्री होत असल्याचे शेतकरी सचिन गावंडा व देविदास पवार यांनी सांगितले.