
दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे
देगलूर :
देश मजबूत बनवावयाचा असेल तर जात धर्म रुपी संकुचित बेड्यांचा त्याग करून मानवी मूल्यांचा अंगिकार केला पाहिजे, असे आग्रही प्रतिपादन करणारे मौलाना अबुल कलाम आझाद हे खऱ्या अर्थाने सांप्रदायिक सद्भावनेचे प्रतिक होते, असे मत प्राचार्य डॉ. विजय कुलकर्णी यांनी व्यक्त केले. वैकुंठवासी धुंडा महाराज देगलूरकर महाविद्यालयातील इतिहास विभागाच्या वतीने मौलाना अबुल कलाम आझाद जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात अध्यक्षीय समारोप प्रसंगी ते बोलत होते. यावेळी उपप्राचार्य डॉ. प्रकाश कुकाले, प्रा. प्रकाश वारे, प्रा. शंकर पाटील, का. अ. धनंजय देशपांडे, सुदर्शन सरसर यांची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताना प्राचार्य कुलकर्णी म्हणाले की, स्वातंत्र्यलढ्यात ज्यावेळी मुस्लिम लीग ही संघटना ब्रिटिशांच्या फोडा झोडा नीतीला बळी पडत होती, त्यावेळी ब्रिटिशांचा धुर्त कावा ओळखून ब्रिटिश विरोधी पुकारलेल्या चले जाव व तत्सम विविध आंदोलनात मौलाना अबुल कलाम आझाद हे पहिल्या फळीतील नेते होते. स्वातंत्र्य लढ्यातील मौ.अ.क. आझाद यांची कामगिरी ही निर्विवादपणे राष्ट्रीयत्वाला पूरक होती परंतु दुर्दैवाने इंग्रजाळलेल्या मानसिकतेचे काही धूर्त लोक आजही समाजात धार्मिक तेढ निर्माण करत असल्याबाबत खंतही प्राचार्य कुलकर्णी यांनी व्यक्त केली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपप्राचार्य डॉ. प्रकाश कुकाले यांनी केले तर आभार प्रा. प्रकाश वारे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अशोक घाटे, गंगाधर बिरादार, दिगंबर माटोरे यांनी प्रयत्न केले.