
दैनिक चालू वार्ता वृत्तसेवा-
मलकापूर : शिवसेनेच्या(उद्धव बाळासाहेब ठाकरे) दणक्याने बाहेरगावाहून एसटीने अपडाऊन करण्याऱ्या विद्यार्थ्यांच्या पासेसची समस्या मार्गी लागली आहे. तालुकाप्रमुख दीपक चांभारे पाटील यांनी १५ नोव्हेंबर रोजी आगार व्यवस्थापक दादाराव दराडे यांना चांगलेच धारेवर धरले. त्यामुळे विद्यार्थी पासेसकरिता एक जादा काउंटर सुरु करण्यात आले. तर रांगेत लागलेल्या विद्यार्थ्यांना कूपन देण्यात आले. विद्यार्थ्यांची मुख्य अडचण दूर झाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले.
मलकापूर शहरातील शाळा, महाविद्यालयात शिक्षण घेण्यासाठी तालुक्याभरातून जवळपास १० हजारांवर विद्यार्थी एसटीने येणेजाणे करतात. पासेस काढण्यासाठी महिन्याच्या सुरुवातीच्या पाच ते सहा दिवसात खूप गर्दी होते. राज्य परिवहन महामंडळाच्या बसस्थानकात विद्यार्थी पासेस काढण्यासाठी एकच काउंटर सुरु करण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची एकच झुंबड उडते. दरम्यान १५ नोव्हेंबर रोजी पास काढण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना अडचणीचा सामना करावा लागला. त्यामुळे विद्यार्थ्यांनी शिवसेनेचे तालुकाप्रमुख दीपक चांभारे पाटील यांना ही बाब सांगितली. तालुकाप्रमुख यांनी बसस्थानक गाठून परिस्थिती बघितली. आगार व्यवस्थापक दादाराव दराडे यांना चांगलेच धारेवर धरले. विद्यार्थ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन किमान तीन पास काउंटर सुरु करण्याची मागणी केली. त्यांच्या मागणीची तत्काळ दखल घेण्यात आली असून सध्या दोन काउंटर सुरु करण्यात आले. तर पास काढण्यासाठी लागणाऱ्या रांगा कमी करण्यासाठी विद्यार्थ्यांना कूपन देण्यात आले. त्यामुळे विद्यार्थी आरामात पास काढू शकतील. त्यासाठी त्यांना रांगेत उभे राहण्याची गरज भासणार नाही. तालुकाप्रमुख दीपक चांभारे पाटील यांच्या शिवसेना स्टाईल दणक्याने विद्यार्थ्यांची पासेसची समस्या मार्गी लागली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाची लहर पसरली होती. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख दिपक चांभारे पाटील तसेच विद्यार्थी सेना जिल्हा उप प्रमुख मंगेश सोनोने हजर होते.
….बॉक्स..
मलकापूरला ६६ खेडी जोडलेली
मलकापूर तालुक्यात ६६ गावे आहेत. या गावांतून मोठ्या संख्येने विद्यार्थी मलकापूरमधील शाळा, महाविद्यालयात शिकायला येतात. पास काढून बसने अपडाऊन करतात. मात्र पास काढण्यासाठी त्यांना नेहमीच खूप त्रास सहन करावा लागतो. एसटी महामंडळाचा भोंगळ कारभार आणि अत्यल्प मनुष्यबळ याचा फटका विद्यार्थ्यांना बसतो. पास काढण्यासाठी लांब रांगा लागतात. रांगेत तासनतास उभे राहावे लागते. सोमवारी रांगेत उभे असलेल्या विद्यार्थ्याला चक्कर आली होती.