
दैनिक चालू वार्ता जिल्हा उपसंपादक -दत्तात्रय वामनराव कराळे
परभणी : उत्तर -पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार गजानन कीर्तिकर हे कुशल संघटक नेते असून त्यांनी मुंबईतील भारतीय रिझर्व्ह बॅंकेसह अनेक राष्ट्रीयकृत बॅंकांमधून कर्मचारी-अधिकारी वर्गांसाठीची जी युनियन मागील अनेक वर्षांपासून चालविली आहे, ती कुशल अशा नेतृत्वाखालीच म्हणावी लागेल. कामगार व अधिकाऱ्यांना एकसंघ करुन प्रशासकीय कामकाजांबरोबरच शिवसेना नामक संघटनेची पाळेमुळे त्या त्या क्षेत्रांमधून रुजविण्याचे एकछत्री काम त्यांनी केले आहे.
खा. कीर्तिकर यांनी नुकताच ठाकरे गटातून एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना गटात जाहीर प्रवेश केला आहे. मुंबईतील गोरेगाव विधानसभा मतदार संघातून त्यांनी दोन-तीन टर्म आमदार म्हणून नेतृत्व केले आहे. सामाजिक कार्याबरोबरच विकास कामांचाही डोंगर त्यांनी आपल्या मतदार संघात उभारला आहे. मागील दोन टर्म ते उत्तर-पश्चिम मुंबई या लोकसभा मतदारसंघाचे नेतृत्व करीत आहेत. सदर लोकसभा क्षेत्रातही गजानन कीर्तिकर यांनी असंख्य अशी विकासाभिमुख कामे राबविली आहेत. शासकीय-निमशासकीय आणि विविध सामाजिक संस्थांतर्फे निर्माण नवनवीन योजना राबवून त्यांनी आपल्या मतदारसंघातील तरुण-तरुणी, महिला-पुरुष आणि कार्यकर्त्यांना रोजगार मिळवून देण्याचे महत्प्रयाशी काम केले आहे. स्थानीय लोकाधिकार समितीच्या माध्यमातून त्यांनी विविध बॅंकांमध्ये केले जाणाऱ्या कामगार-अधिकारी भरती संबंधीचे प्रशिक्षण केंद्र मागील अनेक वर्षांपासून कार्यरत ठेवले आहे. मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक मोठमोठ्या कंपन्यांमधून लोकाधिकार समितीच्या माध्यमातून कामगार-अधिकारी वर्गाला प्रशिक्षित करुन त्या त्या कंपन्यांमध्ये एकसंघ युनिटीबरोबरच उत्पादन क्षेत्रातही अधिकाधिक वाढ करण्यासंबंधी चे मार्गदर्शन केंद्र चालविली आहेत. त्याशिवाय या सर्व युनीटच्या माध्यमातून राज्यात कोणत्याही निवडणूका असोत, त्या निवडणूक समयी प्रत्येक कंपन्यांमधील युनीटवर कार्यरत पदाधिकारी यांचे निरनिराळे समूह राज्यभर अर्थात तालुकानिहाय पाठविले जात असतात. या समुहातील नियुक्त अधिकारी शिवसेनेच्या स्थानीय व मुंबईतून नियुक्त पदाधिकारी यांच्या खांद्याला खांदा लावून अगदी समन्वयाने पक्ष संघटनेची व निवडणूकी संबंधीची सर्व कामे हाताळण्याची महत्वपूर्ण अशी जबाबदारी पार पाडली जाते.
गजानन कीर्तिकर यांना प्रेमाने गजाभाऊ या नावाने संबोधले जाते, ओळखले जाते. शिवसेना पक्षाचे नेते म्हणून गेली अनेक वर्षे ते अग्रक्रमाने करीत असतात. आपला विधानसभा मतदारसंघ असो वा लोकसभा, त्या क्षेत्रांतर्गतच्या सर्व शिवसेना शाखांमध्ये कार्यरत पदाधिकारी नियुक्त्या संघटनात्मक जबाबदारी देण्याचे, हाताळण्याचे पार पाडून घेण्याचे कौशल्य तेथे जसे राबवतात किंबहुना तीच कार्यप्रणाली राज्यात जेथे जेथे संघटनात्मक कार्यासाठी गजाभाऊ जातात, तेथे राबवून घेतात. नव्हे हा त्यांचा हातखंडाच म्हणावा लागेल. गेली कित्येक वर्षे ते शिवसेनेत प्रथम फळीतील नेते म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्यावर पक्षातर्फे महत्वपूर्ण अशा विविध जबाबदाऱ्या टाकण्यात आल्या. विश्वासाला तडा जाईल असे किंवा संघटनेला बाधक होईल असे कोणतेही काम गजाभाऊंनी कार्यरत काळात केले नाही. उलटपक्षी संघटनेत तसा कोणी प्रयास केला किंवा करण्याचा प्रयत्नही जर कोणी करीत असल्याचे कानी आले तर त्याला संबंधित शाखेत बोलावून घेऊन सज्जड दम देण्याचेही काम केल्याचे अनेकदा आढळून आले आहे. त्याचेच फलित म्हणून गजाभाऊंना राज्यात दोन वेळा मंत्रीपदाची दिलेली जबाबदारी त्यांनी सच्चोटीने व संघटना नावारुपाला येईल अशीच हाताळली आहे. राज्यातील परिवहन खाते, गृह खाते व अन्य काही महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी गजाभाऊंनी सन्मानपूर्वक सांभाळली आहे.
तत्कालीन शिवसेना नेते रामदासभाई कदम यांचे वास्तव्य आणि कार्यक्षेत्र असलेल्या कांदिवली पूर्व परिसरापर्यंत गजाभाऊ यांचा विधानसभेचा मतदार संघ अस्तित्वात होता आणि रामदासभाई हे कोकणातील खेड विधानसभा मतदारसंघातून निवडून यायचे. त्यामुळे भाई आणि भाऊ यांची राजकीय व संघटनात्मक शक्ती पूर्णपणे पोषक ठरली जात असे.
कालांतराने लोकसभेवर गेलेले गजाभाऊ उत्तर-पश्चिम मुंबई या लोकसभा क्षेत्रातून खासदार झाले. त्यामुळे कांदिवली परिसर थोडा दूरावस्था गेला असला तरी संघटनात्मक जबाबदारीशी नाळ जुटलेलीच आहे हे विसरता येणार नाही.
मधल्या काही काळापासून संघटनेत अंतर्गत मतभेद, गटबाजीला उधाण आल्यामुळे कांहीं नेत्यांकडून विरोधात खतपाणी घातले गेल्याची वदंता आहे. परिणामी संघटनात्मक कार्यासाठी अग्रभागी असलेल्या गजाभाऊंसारख्या ज्येष्ठ नेत्यांना जर गैरसमज पसरवून दूर केले गेले जाते तेथे कार्यकर्ता व पदाधिकारी यांची गत काय होऊ शकेल याचाही विचार होणे स्वाभाविक आहे. दिल्लीतल्या पक्षीय व लोकसभा क्षेत्रीय राजकारणापासून गजाभाऊंना बरेचसे लांब ठेवले गेले. राज्यातील निर्णायक प्रणाली पासून गजाभाऊंना लांब ठेवण्यात आले. त्यांच्या विरोधात या ना कारणांवरुन राळ उठविण्यात आली. शिवसेना नेते सुभाष देसाई व अन्य काही नेते आणि व त्यांच्या समर्थकांनी गजाभाऊंना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यापर्यंत जाणे किंवा त्यांचा गजाभाऊंच्याप्रति गैरसमज निर्माण करणे यावरच अधिक भर दिला जात असे असा बोलबाला बऱ्यापैकी वाढीस लागला होता. एकूणच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्यकाळात आघाडीवरचे निर्णय घेणारे गजाभाऊ यांना मागील काही वर्षे म्हणजेच बाळासाहेब ठाकरे यांच्या जाण्यानंतर एकदम कोनाड्यातच केले गेले असल्याची चर्चा वाढीस लागली होती. त्यांची घुसमट वाढीस लागली होती. या व अशा अनेक चिंताजनक बाबींचा विचार करुन गजाभाऊंनी एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील होण्याचा निर्णय घेतला असावा,असेच दिसून येत आहे.
मराठवाड्यातील शिवसेना बांधणीची व संपर्क नेतेपदाचीही जबाबदारी गजाभाऊ यांच्यावर सोपविण्यात आली होती. रामदास भाई यांच्यावरही मराठवाड्यातील संपर्क मंत्री पदाची धुरा सोपविली गेली होती. ते सुद्धा या अगोदरच शिंदे गटात गेले आहेत. आता पुन्हा भाई आणि भाऊ शिंदे गटात एकत्र आले आहेत. उभय नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली शिंदे गटाच्या बाळासाहेबांच्या शिवसेनेला चांगली उभारी मिळू शकेल असा विश्वास दस्तूरखुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे. तेही चित्र भविष्यात दिसून येणारच आहे.
गजाभाऊ यांचे चिरंजीव अमोल कीर्ति कर हे युवा सेनेचे प्रदेश सरचिटणीस म्हणून कार्य करीत आहेत. असे असतानाही गजाभाऊंना पक्ष सोडण्यापूर्वी तिचा एवढ्या मोठ्या टोकाचा निर्णय घेणे भाग पडले. पक्ष सोडतांना त्यांनी मुलगा अमोलच्या कानावर सर्व परिस्थिती घातल्याचे समजतंय. मी पक्ष सोडून एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील होत असून तुला यायचे असेल तर असेही सूचित केले परंतु अमोल द्वारा पक्षांतराची असहमती मिळाल्याचे गजाभाऊंनी माध्यमांसमोर कबूल केले. गणेशोत्सवादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गजानन कीर्तिकर यांच्यासह पहिल्या फळीतील अनेक वरिष्ठ नेत्यांच्या गाठी भेटी घेतल्या होत्या. त्यामध्ये राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा भारतीय लोकसभेचे माजी अध्यक्ष प्रिं. मनोहर जोशी, माजी मंत्री लीलाधर डाके, गजाभाऊ कीर्तिकर, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह अनेक नेत्यांच्या भेटी घेतल्या होत्या. त्याच भेटीनंतर गजाभाऊंनी पक्षबदलाचा घेतलेला निर्णय एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना यात जाहीर प्रवेश करुन पूर्णत्वास नेल्याचे आता सिध्द झाले आहे. भाई (रामदास कदम)आणि भाऊ (गजानन कीर्तिकर) हे दोन्ही नेते मराठवाड्यातील एकनाथ शिंदे यांची “बाळासाहेबांची शिवसेना” प्रगती पथावर नेण्यासाठी जीवाचे रान करतील याची खात्री अनेकांना वाटणे स्वाभाविक आहे. तथापि मागील काही वर्षांपासून “उद्धव बाळासाहेब ठाकरे” यांच्या शिवसेनेत होणारी घुसमट आता पूर्णपणाने दूर होईल आणि यापुढील काळात हे दोन्ही नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुरक व प्रेरक ठरु शकेल अशी शिवसेनेची वाढ तर करतीलच शिवाय हा झंझावात केवळ मराठवाडाच नव्हे तर संपूर्ण राज्याला आदर्श ठरला जाईल यासाठीची मेहनत ते नक्कीच घेतील असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.