
दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी-नवनाथ यादव
भुम:- शहरातील पोलीस ठाण्यात धैर्य, शौर्य, पराक्रम दाखवणाऱ्या २६/११ च्या हल्ल्यातील वीरांना तसेच नागरीकांना अभिवादन व श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी भूम पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक मंगेश साळवे यांनी उस्मानाबाद जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून तसेच भूम तालुक्याचे उपविभागीय पोलीस अधीक्षक दिनकर डंबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली भूम पोलीस ठाण्यात भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. सध्या महाराष्ट्रात रक्ताचा तुटवडा जाणवत असल्यामुळे ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक मंगेश साळवे यांनी रक्तदानाचे आयोजन केले होते. त्यानिमित्ताने वकील, सामाजिक संस्था, तरुण वर्ग, शहरी भागातील तसेच ग्रामीण भागातील नागरिक, स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थी, सामाजिक, राजकीय पदाधिकारी यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. या शिबिरात ३५७ रक्तदात्यांनी सहभाग घेऊन रक्तदान केले. रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्यास पोलीस निरीक्षक मंगेश साळवे यांच्या वतीने स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन पुस्तक, एक ट्रॅक सूट, प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी पोलिस उपनिरीक्षक आर. ए. जिनेरी, पोलिस अधिकारी आकाश उंदरे, शशिकांत खोत, राजाभाऊ सोनार, दाजिबा गव्हाळे, शिवराज घाडगे यांच्यासह पोलिस ठाण्याचे कर्मचारी, होमगार्ड, पोलिस पाटील संघटना व पोलिस मित्र परिवार यांनी परिश्रम घेतले.