
दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी- संतोष मनधरणे
देगलूर प्रतिनिधी:
;सक्तीची विजबील वसूली करण्याच्या उद्देशाने महावितरण कंपनी ही शेतकऱ्यांच्या कृषीपंपाची वीज तोडून शेतकऱ्यांना अडचणीत गाठून सक्तीची विजबील वसूली करत आहे. मागील दोन दिवसांपासून महावितरण कंपनी देगलूर तालुक्यासह नांदेड जिल्ह्यातील अनेक कृषीपंपाची वीज तोडणी करते आहे. रब्बी पिकांना पाणी देण्याची वेळ असताना महावितरण कंपनी ही शेतकऱ्यांची मुस्कटदाबी करते आहे. राज्य अन्न सुरक्षा आयोगाने दिलेल्या आदेशाप्रमाणे महावितरणला वीज तोडता येत नाही. हा संदर्भ देत सामाजिक कार्यकर्ते तथा शेतकरी नेते कैलास येसगे कावळगावकर यांनी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत व अप्पर जिल्हाधिकारी पी. एस. बोरगावकर यांची भेट घेऊन कृषीपंपाची चालू असलेली तोडणी तात्काळ थांबवावे या मागणीचे निवेदन दिले.
खरीप पिकांच्या वेळी झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसानी झाली. शेतकरी आर्थिक विवंचनेत असताना शेतकऱ्यांकडून सक्तीची विजबील वसूली करणे अन्यायकारी ठरेल. आता रब्बी पिकांना पाणी देण्यासाठीचा महत्वपूर्ण काळ असताना अशा वेळी वीज तोडणी केल्यास रब्बी पीके वाळून जातील. म्हणून ही वीज तोडणी तात्काळ थांबवावी अन्यथा शेतकऱ्यांनी कायदा हातात घेतल्यास यासाठी सर्वस्वी शासन व प्रशासन जबाबदार राहील असा धमकीवजा इशारा कैलास येसगे यांनी दिला. मा. जिल्हाधिकारी यांनी राज्य अन्न सुरक्षा आयोगाचा संदर्भ देत महावितरण कार्यालयास आदेशान्वित करण्याचा शब्द दिला.