दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती :-नोव्हेंबर महिन्यात दोन माता मृत्यूनंतर आता दोन उपजत मृत्यू झाल्याने उपजिल्हा रुग्णालयाच्या कार्यक्षमतेवर मेळघाटात प्रश्नचिन्ह लागलेले आहे.मागील चार दिवसात दोन मातांची सामान्य प्रसुती करण्यात आली असता बाळांचा मृत्यू झालेला आहे.एका मातेला गंभीर अवस्थेत अमरावती हलविण्यात आलले आहे.
एकीकडे सरकार,एनजीओ,आरोग्य प्रशासन तथा सामाजिक कार्यकर्ते मेळघाटातील आदिवासींना प्रसुती उपचार तथा आरोग्य शिबिराचा उपयोग करण्याचा सल्ला वेळोवेळी देत असल्याने आता कुठे मोठ्या संख्येत उपजिल्हा रुग्णालयात प्रसुतीसाठी माता येत आहेत.मात्र मागील दोन आठवड्यात दोन माता मृत्यू आणि दोन उपजत मृत्यू झाल्याने पुन्हा १९९३-९४ सारखी स्थिती येण्याची दाट शक्यता आहे.
साद्राबाडी येथील सुनिता सुधाकर पवार या महिलेची प्रसुती धारणी उपजिल्हा रुग्णालयात करण्यात आली.मात्र सिजर केल्याशिवाय प्रसुती झाली तरी उपजत मृत्यूचा खुलासा करण्यात न आल्याने संताप व्यक्त होत आहे.मृत बाळ बाहेर आल्याने या आधी सिजर का करण्यात आले नाही किंवा प्रसुतीवेळी बाळ जिवंत होता,अशी चर्चा आहे.तीन दिवसानंतर हिराबाई गावाच्या मातेची प्रसुती करण्यात आली.मात्र बाळ मृत अवस्थेत पोटातच मरण पावल्याचे सांगण्यात आले.यावेळी पण सिजर न करताच प्रसुती सामान्य करण्यात आली.यामुळे आदिवासी समाज पुन्हा शासकीय आरोग्य सेवेपासून दूर जाण्याची शक्यता वाढलेली आहे.
उपजिल्हा रुग्णालय पांढरा हत्ती?
१९९३-९४ वर्षात कुपोषण व बालमृत्यू जगासमोर आल्यानंतर मेळघाटकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागलेले होते.धारणीत ग्रामीण रुग्णालयाच्या जागी उपजिल्हा रुग्णालय थाटण्यात आले.पाच वर्षांनंतर या अवाढव्य इमारतीत कोट्यवधी रुपये खर्चून आधुनिकीकरण करण्यात आले.वेगवेगळ्या सुविधा देण्यात आल्या.मात्र आरोग्य प्रशासन आपल्या डॉक्टर्स आणि सेवेत असणान्या कर्मचान्यांना जागृत करण्याचे विसरले.आधुनिक सुविधा मोठ्या प्रमाणात उपलब्ध करण्यात आल्या तरी कर्मचाऱ्यांमध्ये आणि प्रामुख्याने डॉक्टरांमध्ये सेवेचा भाव नसल्याने माता मृत्यू,बालमृत्यू तथा उपजत मृत्यू सारखे वाढत आहे.प्रशासन व आरोग्य कर्मचाऱ्यांना आदिवासी रुग्णाच्या सेवेविषयी मार्गदर्शन करण्याची गरज आहे.
