
दैनिक चालू वार्ता वृत्तसेवा-
परभणी : शहरांतर्गतच्या खानापूर नगरीत आज अखंड हरिनाम पारायण सप्ताहाची सांगता संपन्न झाली. त्या अनुषंगाने काढण्यात आलेल्या भव्य अशा शोभायात्रेत सुसज्ज अशी सजवलेली ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी ग्रंथांची पालखी, धष्टपुष्ट असा सजविलेला अश्वमेध आणि त्यावर विराजमान बाल शिवाजी महाराज, त्यांच्या हातातील भगवा ध्वज, महापुरुषांच्या परिधान वेषातील बच्चे कंपनी, सांप्रदायिक भजनी मंडळ आणि हजारोंच्या संख्येतील समाविष्ट भाविक महिला वर्ग लक्षणीय असेच दृष्य होते.
मागील सात दिवसांपासून खानापूर नगरीत अखंड हरिनाम पारायण सप्ताह सुरू होता. प्रवचनकार, कीर्तनकारांच्या रुपाने उपस्थित अनेक हरिभक्त पारायणकार मान्यवरांचे सुश्राव्य कीर्तन, भजन उपस्थित भाविक भक्तांसाठी बहुमोल असेच मार्गदर्शक ठरले गेले. टाळ-मृदंगाचा निनाद, अभंग वाणी, भक्ती गीते आणि पारायणाच्या ओव्या रात्रंदिवस श्रवणकर्णी पडत होत्या त्यामुळे जणू काही एखाद्या धार्मिक स्थळाचे वैभव या खानापूर नगरीला प्राप्त झाले होते. अखंड पारायणाच्या मागील सात दिवसांच्या कालावधीत येथे आलेल्या समस्त भाविक भक्तांना जसा सुश्राव्य अशा पारायणाचा लाभ मिळत होता तसाच स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद सुध्दा नियमित मिळत होता. मागील अनेक वर्षांपासून चालत आलेली परंपरा कायम राखत आपल्या हातून या निमित्ताने सेवाभावी कार्य घडले जावे म्हणून या उदात्त हेतूने येथील ग्रामस्थ मंडळी अहोरात्र झटतांना दिसत होती. अगदी शिस्तबद्ध पद्धतीने व धार्मिक कार्याला अनुसरून सर्व जबाबदाऱ्या संयमाने पार पाडताना येथील स्वयंसेवक दिसत होते.
अखंड हरिनाम पारायण सांगता सोहळ्याच्या निमित्ताने आज काढण्यात आलेल्या शोभायात्रेत असंख्य भाविक भक्तांनी सहभाग घेतला होता. त्यात महिलांची लक्षणीय उपस्थिती होती. सांप्रदायिक वारकरी, भजनी मंडळ व कार्यकर्त्यांनी टाळ-मृदंगाच्या निनादात परिसर दुमदुमून टाकला होता. बच्चे कंपनीने विविध महापुरुषांच्या गणवेशात दाखवलेला सहभाग स्फूर्तिदायक असाच होता. काही तरुण मुली व महिलांनी आपल्या शिरावर तुळशी वृंदावन घेऊन परंपरेचे व शोभायात्रेचे पावित्र्य राखले. धार्मिक परंपरेचा वारसा जपत सजवलेली श्री ज्ञानराज आनेश्वरी ग्रंथांची पालखी आकर्षक दिसत होती. अश्वमेघावर आरुढ बाल शिवाजी व मावळे, हातातील भगवे ध्वज उपस्थितांचे लक्ष वेधून घेणारे ठरले. टाळ-मृदंगाच्या निनादात व अभंगाच्या तालावर ठेका घेणाऱ्या भाविक महिलांमुळे या शोभायात्रेचे महत्व अधिकच वाढले गेले.
व्यवस्थापकीय समितीच्या नियंत्रणाखाली कार्यरत स्वयंसेवकांची बटालियन धार्मिक परंपरेला साजेसे व नियमांच्या चाकोरीत राहून सेवेचं काम करतांना दिसून आली. त्यामुळे सांगता समारोह असो वा नियमित अन्नधान्याच्या पंगतीत काहीच विनाकारण वाया गेल्याचे आढळून आले नाही हे विशेष होय.