
दैनिक चालू वार्ता उपसंपादक परभणी- दत्तात्रय वामनराव कराळे
परभणी : वीज महावितरण कंपनीकडून होणाऱ्या नानाविध ससेमिऱ्यांमुळे बळीराजा पूरता अडचणीत सापडला आहे. परिणामी संतापलेल्या शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे आज डिसेंबर महिन्याच्या प्रारंभीच तीव्र आंदोलनात्मक घेरावचा पवित्रा अंमलात आणल्यामुळे घाबरलेले वीज महावितरण अधीक्षक अभियंता शांतीलाल चौधरी यांनी निवेदन स्वीकारुन आंदोलन नेतृत्वाला ठोस कारवाईचे आश्वासन दिले.
रब्बी हंगामाला प्रकल्पाकडून सिंचनासाठी पुरेसे पाणी सोडण्यात आले परंतु वीज महावितरण कडून लादण्यात आलेले मोठ्या अवधीचे भारनियमन, वारंवार खंडित केला जाणारा वीज पुरवठा, मीटर कापणे अशा नानाविध कारणाने जिल्हाभरातील बळीराजा कमालिचा मेटाकुटीला आला आहे. या अगोदर पावसाअभावी झालेल्या उष्माघाताने उभी पिकं करपली गेली तर परतीच्या संततधार पावसामुळे हातात तोंडाशी आलेली पिके जळून खाक झाली. तर कित्येकांच्या पिकांमध्ये साचलेल्या पाण्यामुळे भरलेला दाना नष्ट झाला. असं असूनही सरसकट शासनाकडून पिकांचे सर्व्हेक्षण व नुकसान भरपाई देण्यात आली नाही. त्यामुळे अगोदरच आर्थिक विवंचनेत सापडलेल्या बळीराजाला सहकार्य करुन हातभार लावण्यापेक्षा वीज महावितरण कंपनीकडूनही या ना त्या कारणांमुळे वेठीस धरले जात आहे. त्याचाच परिपाक म्हणून बळीराजाची पाठराखण करणाऱ्या शिवसेनेने अखेर मैदानात उतरुन थेट अधीक्षक अभियंत्यांनाच घेराव घातला. “मागण्या मान्य करा अन्यथा गाठ आमच्याशी आहे असे सांगून सामोरे या” अशी ताठर भूमिका मांडली. वरील समस्यांचा समावेश करुन अधीक्षक अभियंता शांतीलाल चौधरी यांना निवेदन झोपत आंदोलनरुपी घेराव चे स्वरुप कठोर करताच नरमलेले चौधरी यांनी ठोस कारवाईचे आश्वासन दिले. त्यामुळे आर या पार चे रणशिंग फुंकलेल्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सुध्दा दोन पावलं मागे येणंच हितावह समजून घेरावोचे आंदोलन तूर्तास संस्थगित केले. दरम्यान आंदोलन नेतृत्वाला दिलेल्या आश्वासनाची अधीक्षकांनी तात्काळ अंमलबजावणी करुन महावितरणमधील जे कोणी अधिकारी व कर्मचारी जाणिवपूर्वक शेतकरी शेतमजूरांना सतावतात, त्यांच्यावर तात्काळ ठोस कारवाई करुन पूर्तता केली म्हणजे चांगले एवढे नक्की.
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विशाल कदम, गंगाप्रसाद
आणेराव यांच्या नेतृत्वाखाली या घेराव आंदोलनात जिल्ह्यातील पक्षाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी, शेतमजूर मोठ्या संख्येने उपस्थित होते.