
दैनिक चालू वार्ता कंधार ग्रामीण प्रतिनिधी -बाजीराव गायकवाड
आरपार ही लेखिका कमल कदम यांच्या व्यक्तिमत्वाची दुधारी तलवार आहे. या तलवारीच्या एका बाजूला संसारी,प्रेमळ, शांत ,कठोर निर्णय न घेऊ शकणारी, सचोटीने,प्रामणिक पणे,चारित्र्य संपन्न आयुष्य जगणारी, मदतगारांची जाणीव असणारी सयंत जबाबदारीच्या व्यक्तिमत्वाची धार आहे तर दुसऱ्या बाजूला, शिक्षणासाठी अति आग्रही असणारी, अपमान अवहेलना दुर्लक्षित करून सतत संघर्ष करत रहाणारी, ध्येयवादी ,जिद्दी, कणखर पणाची विचारी धार आहे.काळजाच्या आरपार जाणारी ही धार- धार तलवार घेऊन कमलताई कादंबरीच्या प्रत्येक पानावर आपल्यालाही त्यांच्या रणांगणावर खिळवून ठेवतात.
एखादी स्त्री, बालपण, तारुण्य, प्रौढत्व, त्यातल्या कमजोरी आणि ताकदी बद्दल किती स्पष्टपणे,प्रामणिक पणे लिहू शकेल हे वाचायचे असेल तर लेखिका कमल कदम लिखित आत्मचरित्र, आरपार आवर्जून वाचायलाच हवे.ही कादंबरी वाचायला सुरवात केल्यावर मी लेखिके बरोबर केंव्हा एकरूप झाले हे समजले सुद्धा नाही.
कादंबरीच्या सुरवातीलाच मनोगत सांगताना कमलताई “माझेही काहीतरी चुकले असणार” हे कबूल करतात. कादंबरीच्या शेवटी मात्र त्यांचे हे विचार आपल्याला अनाठाई वाटतात. त्यांच्या या भूमिकेमुळेच ही कादंबरी म्हणजे निव्वळ एक आत्मकथा नसून लेखिकेचे आत्मभान सुद्धा आहे याची आपल्याला जाणीव होते. इतर अनेक आत्मचरित्र आणि आरपार यात मोठाच फरक आहे. माणूस पणाची जाणीव असण्याची अपेक्षा. प्रामणिक वास्तव चित्रण, संघर्षाची परिसीमा, बदलत्या काळाचा प्रवाह ,आणि सर्वात महत्वाचे म्हणजे शिक्षण आणि संसार ही तारेवरची कसरत करताना होणारे जीवाचे आणि मनाचे हाल..हे या कादंबरीचे वेगळेपण आहे.
आरपार वाचताना शब्दागणिक, वाक्यागणिक आपल्याला आपण जगत असताना येत असलेल्या अडचणी आणि वेदना कमलताईंच्या तुलनेने अगदीच किरकोळ आहेत हे सतत जाणवते. आपल्या भरल्या पोटीच्या सामाजिक प्रश्नांचे थीटेपण समजून येते. मी पूर्वी कधीतरी मागासवर्गीयांचा संघर्ष घरातील ज्येष्ठांकडून ऐकत असे. पण घरात सुधारणावादी मतप्रवाह असल्याने कोणतेच भेदाभेद प्रत्यक्ष पाहिले नव्हते. लहानाची मोठी होत असताना चारचाकी गाडी असलेले श्रीमंत आजूबाजूला पाहून मला स्वतःच्या आर्थिक परिस्थितीबाबत वैषम्य वाटत असे. प्रत्यक्षात रोज ताज्या भाकरीचा चंद्र म्हणजेच श्रीमंती हे आकलन व्हायला उशीर झाला. गरिबी, भेदाभेद, त्याची खरी दाहकता अशा सरळसोट मांडणीच्या अशा पुस्तकांमधून मनात झिरपत राहिली . या दृष्टीने हे पुस्तक अनमोल आहे. समाजातल्या पार तळागाळा पर्यंत पोहचण्यासाठी आरपार सारखी पुस्तके हेच साधन आहे. तरीही मगाशी मी लिहिले की वाचताना मी कमलताईं बरोबर एकरूप झाले. ही केवळ त्यांच्या लेखनाची आणि मांडणीची कमाल अहे. साहित्य क्षेत्रात एक कवितासंग्रह प्रसिद्ध असणारी ही कवीयित्री , ताकदीची लेखिका सुद्धा आहे. साधी सोपी प्रवाही भाषा. काळाबरोबर पुढे सरकणारा समाज दाखवण्याची क्षमता ही कादंबरीची बलस्थाने आहेत. छोट्या छोट्या प्रकरणातून कमलताईची जीवनगाथा पुढे येते.सोपी सरळ स्पष्ट वाक्यरचना भावनांना आव्हान देणारी आहे. कादंबरी वाचून पूर्ण झाली तरीही त्यातले प्रत्येक प्रकरण अनेक दिवस या ना त्या प्रहारात भोवती रुंजी घालत राहाते. आपल्याला नेमके काय वाटतेय हे लेखणीतून उतरल्याशिवाय मन शांत होणार नाही हे जाणवून हा लेखन प्रपंच हाती घेतला.
लेखिकेच्या वाट्याला एवढा संघर्ष का आला? तर शिक्षणाचे ,निर्णयाचे स्वातंत्र्य तिला हवे होते. ज्यांना नुसती सुरक्षितता हवी असते त्या कुटुंबाला हालाखीत जगणे मान्य करावे लागते तर ज्यांना परिस्थितीत बदल करण्याचे स्वातंत्र्य हवे असते त्यांच्या वाट्याला संघर्ष अटळ असतो.अर्थातच कमल ताईनी स्वातंत्र्याचा संघर्ष स्वीकारला. एका मागास वर्गीय बांधकाम मजुराची नको असलेली मुलगी ते शिक्षण विस्तार अधिकारी हा प्रवास.. रोचक- रोमांचक असूनही जातीव्यवस्थे वर, पुरुषसत्ताक पद्धतीवर ताकदीने प्रहार करणारा आहे मुलगा झाला नाही म्हणून जन्मतः नाराज कुटुंब.. भयानक गरिबी..त्यात बहिणींचे मृत्यू.. वडिलांची माया..अतीव कष्टाळू आई आणि सुधारणावादी काकाचा प्रभाव.. अकाळी, लहान वयात ,नको असताना झालेले नात्यातले लग्न .. शिक्षण किंवा संसार यातल्या एकालाच परवानगी ज्असताना .. शिक्षण तुटते का संसार तुटतो ?या प्रश्नाबाबत ऐन तारुण्यात कमलताई नेमका काय पवित्रा घेतात हे पुस्तकात वाचताना अंगावर शहारे येतात.
कथा सुरु होते ती खुळखुळ्याच्या काठी बरोबर येस्करकी करुन जगण्याच्या संघर्षाबरोबर.. संघर्ष अधिकच वाढतो जेंव्हा बाबासाहेब आंबेडकरांचे विचार प्रत्यक्षात जगण्याचा हट्ट धरणारा जिज्या घरातील मुलींच्या शिक्षणासाठी आग्रही राहातो. (कमलताई एक अधिकारी झाल्यावर जिज्याकाकाला काय वाटले.. या प्रवासात त्याची कुठवर साथ होती हे वाचायला
आवडले असते… पुढच्या आवृत्तीत हे जोडले जाईल अशी अपेक्षा.) शिक्षणासाठी न झेपणारा खर्च, घरकामातून मुश्किलीने मिळणारा वेळ आणि मागासवर्गीय म्हणून होणारी अवहेलाना, या अडचणी कमलताईना एका सुज्ञ आणि प्रेमळ शिक्षिकेपुढे किरकोळ वाटतात.
काय जादू केली असेल या शिक्षिकेने त्यांच्यावर ?कसे होत होते घासलेटच्या दिव्या खालचे कमलताईंचे शिक्षण ? आणि लग्नानंतर काय निर्णय झाला शिक्षणा बाबत ? असा हा शिक्षण अध्याय संपता संपताच ठिकठिकाणच्या गावातली बदलीची नोकरी आणि नाकर्ता नवरा , आईवडिलांची साथ होतीच पण तीन तीन गरोदरपणाच्या काळातले शरीरिक , मानसिक हाल, नवऱ्याचे गावोगावी मौज मजा करत फिरत रहाणे, त्याच बरोबर काही ना काही कारणाने येत असलेल्या कुटुंबाच्या दवाखन्याच्या वाऱ्या अशा बिकट परिस्थितीतहि भविष्यासाठी घेतलेले धाडसी निर्णय म्हणजे एखाद्या असामान्य स्त्रीच्या कर्तबगारी चा प्रवास आहे.
कमलताई नवऱ्याला छैलाबाबू म्हणायच्या .छैलाबाबू हे नुसते नावच नाही .ही एक प्रवृत्ती आहे . त्यांनी मजेदार समर्पक अशा एकाच शब्दात या वृत्तीचे वर्णन केले आहे .छैलाबाबूंचा त्यांना वारंवार त्रास झाला . पण हव्या तेवढ्या तीव्र भाषेत त्यांनी तो कादंबरीत व्यक्त केलेला दिसत नाही. वाचताना मलाच त्यांच्यापेक्षाही अधिक राग आला असावा ! कमलताईंच्या स्वभावातच रागावणे , माणसे तोडणे ,कठोर वागणे नाही.मग कसेही असले तरी छैलाबाबू तर त्यांचे पती होते. हे नाते एकतर्फी कमलताईंकडूनच निभावले गेले म्हणून टिकले हे वास्तव आहे. उत्तरार्धात छैलाबाबूला याची जाणीव होते हे विशेष! पतीकडून चांगल्या प्रसंगी, चांगल्या कामाची न मिळालेली शाबासकी , अडचणीच्या वेळेस न मिळालेली साथ, या उलट पुरुष म्हणून सतत दाखवलेला वरचढपणा या सगळ्याच अवगुणांकडे कमलताईनी नेहमीच दुर्लक्ष केल्यामुळेच त्यांची उन्नती होऊ शकली असावी. तरीही प्रसंगी कठोर न होता आल्यामुळे त्यांना बऱ्याच अडचणींना तोंड द्यावे लागले आहे .कमलताईंची निर्णय क्षमता त्यांनी नवऱ्याला न विचारता केलेल्या फॅमिली प्लॅनिंगच्या ऑपरेशन मध्ये दिसून येते. प्रसंगी छैलाबाबूंचा मार खाऊन सुद्धा त्यांनी आपले योग्य निर्णय बदललेले नाहीत .बहिणीची सहा बाळंतपणे आणि तिला होत असलेला त्रास सुद्धा त्यांच्या संवेदनशील मनाला बघवत नाही. तथापी कमलताईंच्या तीनही मुलांची वाढ होत असतानाचे चित्रण या आत्मकथेत आलेले नाही . बहुतेक नोकरी, शिक्षण व छैलाबाबूंचे त्रास देणे यातून त्यांना मुलांकडे लक्ष देता आले नसावे हे स्पष्ट दिसून येते . त्यांच्या काही श्रद्धा -अनुभव आश्चर्य चकित करतात.
कादंबरीच्या उत्तरार्धात छैलाबाबूंमध्ये झालेला बदल वाचकांसाठी अनपेक्षित ठरणारा आहे .सर्वात शेवटच्या प्रकरणात मुलाकडून झालेल्या मोठया अपराधाला त्यांनी कुठल्याही प्रकारची पाठराखण केलेली दिसत नाही .उलट ” पुरुषसत्ताक पद्धतीमुळेच आपल्याला आयुष्यभर त्रास झाला आणि आपल्या सुनेचा सुद्धा या पद्धतीने बळी घेतला ” अस त्या सहज लिहून जातात. कमल ताईंचे वडील अत्यंत संवेदनशील खंबीर पुरुष होते .त्यांच्या भक्कम पाठिंब्याशिवाय कमल ताईंचे आयुष्य इतक्या उंचीवर जाऊ शकले नसते हे निश्चित .बाबासाहेब आंबेडकरांविषयीची कृतज्ञता या पुस्तकात वारंवार दिसून येते पण त्यांना असलेली सामाजिक जाणीव विशेषतः स्त्री शिक्षण आणि शिक्षण स्त्री – पुरुष समानता अजूनही मूर्त रूपात आलेली नाही ही खंत लेखिका व्यक्त करते .नोकरी करत असतानाचे काही प्रसंग त्यांची कामावरची निष्ठा आणि कौशल्य दाखवून देतात. कमलताईंची शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून नेमणूक म्हणजे त्यांच्या विचारांचे, संघर्षाचे,आणि चारित्र्य संपन्न जीवनाचे गोड फळ म्हणावे लागेल.
आरपार कादंबरीचा शेवट अत्यंत धारदारपणे आपल्या हृदयाचा ठाव घेतो .कधीही बौद्ध विहारात न गेलेल्या छैलाबाबूच्या निधनानंतर त्यांच्या अंतदर्शनाला अचानक बौध्द भिक्खूंचा ताफा येतो याचे आश्चर्य कमलताईंना जरी वाटत असले तरीही हा भिक्खू ताफा म्हणजे फक्त त्यांचीच सचोटीची कमाई आहे हे त्या कसे बरे विसरून जातात ? छैलाबाबूला महान ठरवून या आत्मकथनाचा शेवट होतो हे अनाकलनीय वाटते.कदाचित एक स्त्री त्यातूनही ती मागासवर्गीय म्हणून सतत वाट्याला आलेली सततची अवहेलना त्यांना ,” माझेच काहीतरी चुकले असणार ” या विचारापर्यंत घेऊन येत असावी.
कमालताईंचा जीवन प्रवास वाचकाला खिळवून ठेवतो,विचारप्रवृत्त करतो. आणि स्त्री भावभावनांचा, स्त्री क्षमतेचा आरसा ठरतो. स्वतःला असे आरपार बघू शकणाऱ्या लेखिका कमलताई कदम यांना त्रिवार सलाम!
सविता कुरुंदवाडे, पुणे (समीक्षक)
मो. क्र. 87889 23038