
दैनिक चालु वार्ता मुखेड तालुका प्रतिनिधी- सुरेश जमदाडे
मुखेड -परम श्रद्धेय डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व क्षेत्रातील वंचितांसाठी आयुष्यभर काम केले. कामगार, शेतकरी, महिला, नोकरदार व अन्य वर्गाला न्याय देण्यासाठी लढा दिला. ते केवळ दलितोध्दारक नव्हते तर ते सर्वच अन्यायग्रस्तांचा उद्धार करणारे होते. प्रत्येक क्षेत्रात म्हणजे राजकीय,आर्थिक, सामाजिक, साहित्यिक, पत्रकारिता व अन्य अनेक क्षेत्रात त्यांनी उत्तुंग असे कार्य केले. देशाला जगातील सर्वोत्कृष्ट असे संविधान दिले.ज्याच्या बळावर आपला देश आज कार्यरत आहे. त्यांना शिक्षण घेताना व नंतर ही जातीयतेचे व दारिद्र्याचे चटके सहन करत कार्य करावे लागले. त्यांचे ग्रंथावर अतोनात प्रेम होते. त्यांनी अभ्यासाला सर्वाधिक महत्त्व दिले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणजे बुद्धिमत्तेचे यशोशिखर होते असे प्रतिपादन प्रसिद्ध साहित्यिक माजी प्राचार्य डॉ.रामकृष्ण बदने यांनी ग्रामीण (कला, वाणिज्य विज्ञान) महाविद्यालय वसंतनगर ता.मुखेड च्या राष्ट्रीय सेवा सेवा योजना विभागाकडून आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिना निमित्य प्रमुख वक्ते म्हणुन बोलताना केले.
अध्यक्षीय समारोप करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.हरिदास राठोड म्हणाले की डॉ.बाबासाहेब हे प्रकांड विद्वान होते, न्यायशास्त्रज्ञ होते. अर्थशास्त्रज्ञ होते. राजकारणी, तत्त्वज्ञानी, समाज सुधारक होते. बाबासाहेबांनी महात्मा फुलेंना गुरु मानले. बाबासाहेबांचे प्रत्येकाने चरित्र वाचले पाहिजे.गरीबीचे चटके सहन करत त्यांनी यश प्राप्त केले. ग्रंथालयाला ते आत्मा मानायचे. विद्यार्थ्यांनी बाबासाहेबांची वाचनाची व लेखनाची क्षमता अंगी बाळगावी.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधिकारी प्रा.एस. बाबाराव यांनी करून कार्यक्रम आयोजना पाठीमागची भूमिका व बाबासाहेबांच्या चरित्राचा आढावा घेतला. सूत्रसंचालन व आभार कार्यक्रमाधिकारी प्रा.सौ. अरुणा ईटकापल्ले यांनी मानले.
कार्यक्रमास महाविद्यालयाचे उपप्राचार्य अरूणकुमार थोरवे, सर्वच प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले.