
दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती :- पर्यटन क्षेत्राच्या विकासासाठी आवश्यक सुविधा उभारण्याच्या अनुषंगाने शासकीय यंत्रणेबरोबरच समितीच्या माध्यमातून पर्यटन क्षेत्रात काम करणाऱ्या विविध घटकांचे सहकार्य मिळविण्यात येईल जेणेकरुन क्षेत्रात आवश्यक सुविधा व नवीन संकल्पनांचा विभागाच्या योजना उपक्रमात सहभाग असेल,असे प्रतिपादन राज्याचे पर्यटन,कौशल्य विकास,महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आज येथे केले.
विविध कार्यक्रमांच्या अनुषंगाने मंत्री श्री.लोढा यांचे आज सायंकाळी हॉटेल ग्रँड महफिल येथे आगमन झाले त्यावेळी त्यांनी पर्यटन विभागाची बैठक घेऊन विविध कामांचा आढावा घेतला.खासदार डॉ.अनिल बोंडे,एमआयडीसी असोसिएशनचे अध्यक्ष किरण पातुरकर,पर्यटन उपसंचालक प्रशांत सवाई, निवेदिता चौधरी यांच्यासह पर्यटन क्षेत्रातील व्यावसायिक व तज्ज्ञ उपस्थित होते.
मंत्री श्री.लोढा म्हणाले की,लोक सहभागातून योजना उपक्रमांची परिणामकारकता वाढते हे लक्षात घेऊन पर्यटन क्षेत्रात काम करणाऱ्या व्यावसायिक, उद्योजक व तज्ज्ञ मंडळींचे सहकार्य मिळविण्यात येत आहे.समितीच्या माध्यमातून हे काम पुढे नेले जाईल.जिल्ह्यातील महत्वाच्या पाच पर्यटन स्थळांमध्ये पायाभूत सुविधा व इतर सोयी उभारल्या जातील.नव्या संकल्पनांचा समावेश करुन चिखलदरा महोत्सवाचा उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविला जाईल.हा महोत्सव अधिकाधिक उत्तम व मोठ्या प्रमाणात व्हावा यासाठी पर्यटन विभागातर्फे आवश्यक निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. याबाबत आवश्यक ते नियोजन करुन पुढील डिसेंबर पासून हा महोत्सव व्यापक स्वरुपात साजरा केला जाईल.मेळघाटातील होलीकात्सवाचे महत्व लक्षात घेऊन दि.१० व ११ मार्च रोजी महोत्सव आयोजित करण्याचे नियोजन आहे त्यासाठी पर्यटन विभागातर्फे ५ लक्ष रुपये निधी देण्यात येईल.ते पुढे म्हणाले,अमरावती ही राष्ट्रसंत तुकडोजी महाराज,संत गाडगेबाबा,प्रज्ञाचक्षू गुलाबराव महाराज अशा संतांची भूमी आहे.श्री क्षेत्र कौंडण्यपूर,रिद्धपूर,मुक्तागिरी अशी अनेक पौराणिक,धार्मिक महत्वाची स्थळे या भूमीत आहेत.तेथे आवश्यक पायाभूत सुविधांचा विकास करण्यात येईल.त्याचप्रमाणे रखडलेली कामे गतीने पूर्णत्वास नेण्यात येतील.
मेळघाटात पर्यटकांच्या सुविधेसाठी गाईड तयार करण्यासाठी स्थानिक तरुणांना प्रशिक्षित करावे.पर्यटन वाढीच्या दृष्टीने तज्ज्ञ,व्यावसायिक,उद्योजकांनी समितीच्या माध्यमातून शासनाच्या प्रयत्नांना साथ द्यावी.समितीच्या नियमित बैठका व्हाव्यात.त्यातील चांगल्या संकल्पना व सूचनांची अंमलबजावणी व्हावी तसेच पर्यटन विकासाच्या दृष्टीने काम पुढे जाईल यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.