
दैनिक चालू वार्ता वृत्तसेवा-
पुणे दि.१२: महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ४४ अन्वये जमिनीचे एका प्रयोजनातून दुसऱ्या प्रयोजनात रुपांतर करण्याबाबत नागरिकांच्या समस्या दूर करण्यासाठी व प्रक्रियेत सुलभता आणण्यासाठी भोर उपविभागातील भोर व वेल्हा तालुक्यात १४ ते २८ डिसेंबर २०२२ या कालावधीत सर्व मंडळ अधिकारी कार्यालय, तहसिल कार्यालय भोर व वेल्हा, उपविभागीय अधिकारी कार्यालय भोर आदी ठिकाणी विशेष शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ४२-ड अन्वये सध्या गावाच्या प्रचलित गावठाणाच्या हद्दीपासून बाहेर २०० मीटरच्या आत असलेली कोणतीही जमीन प्रचलित नियमांच्या अधीन राहून मानीव पद्धतीने निवासी प्रयोजनासाठी अकृषक झाली असल्याची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे जमीन गावठाण हद्दीपासून २०० मीटरच्या आत असलेल्या नागरिक अथवा शेतकरी खातेदारांना भोर व वेल्हा तहसिल कार्यालयामार्फत स्वत:हून रुपांतरण कर व जमिनीची अकृषक आकारणीबाबत नोटीस पाठविण्यात येत आहे.
पात्र खातेदारांनी नोटीसीच्या अनुषंगाने कराचा भरणा केल्यानंतर जमीन मालकांना याबाबतची मानीव अकृषक सनद तात्काळ दिली जाईल. याबाबत जमीन भोगवटदार वर्ग २ (देवस्थान व महार वतन वगळून) असेल याबाबतीत सक्षम प्राधिकारी यांचेकडून प्रचलित कायद्याखाली आवश्यक नजराणा भरुन पुढील प्रक्रिया करण्यात येणार आहे.
भोर व वेल्हा तालुका हा दुर्गम स्वरुपाचा आहे. त्यामुळे बहुतांश खातेदारांच्या ७/१२ उताऱ्यावर पोटखराबा अ क्षेत्राची नोंद असल्याने भूसंपादन, पीक कर्ज, विविध स्वरुपाचे शासकीय योजनांचे लाभ आदींमध्ये अडचण येत आहे. सदर पोटखराबा अ क्षेत्रचे लागवडयोग्य क्षेत्रामध्ये आदेश होऊन त्याचा अंमल ७/१२ उताऱ्यावर करण्यासाठीदेखील या शिबीरामध्ये अर्ज घेतले जाणार आहेत.
ही प्रक्रिया पूर्णपणे नि:शुल्क असून या विशेष मोहिमेत सर्व संबंधित शेतकरी खातेदार यांनी लाभ घ्यावा असे आवाहन भोरचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे, भोर तहसिलदार सचिन पाटील आणि वेल्हाचे तहसिलदार शिवाजी शिंदे यांनी केले आहे.