
दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे
देगलूर:देगलूर (प्रतिनिधी)- नांदेड जिल्ह्यातून देगलूर पोलीस ठाणे हे एक संवेदनशील पोलीस ठाणे म्हणून ओळखले जाते. अशातच वरिष्ठ पोलीस निरीक्षक रजेवर असताना काही काळासाठी कार्यभार एका उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याकडे सोपवल्याचा नागरिक व कर्मचाऱ्यांत मोठा चर्चेचा विषय ठरला. म्हणूनच की काय अवैध धंदेवाल्यांनी आपले पाय पसरविले आहेत. मटका जुगार अशा इतर अवैध धंद्यांनी केवळ डोके वर काढले नसून उधम माजविला आहे. या अवैध धंद्यावरची अनियंत्रितता सतत वाढत्या आलेखातच आहे.
एकेकाळी अवैध धंदे वाल्यांचा कर्दनकाळ असे ब्रीद पोलीस निरीक्षकांच्या कार्यशैलीने दाखवून दिले होते. मात्र नव्याचे नऊ दिवस या म्हणीप्रमाणे काम होत असल्याबाबतच्या चर्चेने गगन चुंबले आहे. देगलूर शहरासह तालुक्यातील विविध भागात ही अवैध धंदे बिंदिकतपणे चालू आहेत. दैनिक समीक्षाने केलेल्या अवैध गुटखा विक्रीवर आळा घालण्यासाठी पाठपुराव्याने अन्न औषध प्रशासनाने दखल घेत कार्यवाही करून अवैध गुटखा विक्रीवर नियंत्रण राखण्यात यश मिळवले. मग मटका तथा जुगार अशा देशोधडीच लावणाऱ्या प्रकाराला आळा
घालणे ही आपली जबाबदारी प्रथम स्थानी ठेवून धाडसत्र राबवून कार्यवाही करणे अपेक्षित आहे. बऱ्याच वेळा पोलिसांकडून आम्हाला एवढीच कामे नसतात इतरही कामे असल्याचे सांगण्यात येते. मात्र यावर नागरिकांचे उत्तरही तेवढेच रास्त दिसून येत आहे की, अवैध धंदे हेच गुन्हा घडवण्यास कारणीभूत असतात. कारण मटक्यासारख्या खेळाने दिवसभर केलेली कमाई झटक्यात काढून घेतली जाते. ज्यामुळे त्याच्यासह परिवारावर उपासमारीची वेळ येते.
पोटाची खळगी भरण्यासाठीच तो गुन्ह्याकडे वळतो. म्हणूनच जर मटका व जुगार यांसारखी अवैध धंदे बंद केल्यास हा वादच निर्माण होणार नाही. आणि वाद झाला नाही तर गुन्हाही घडणार नाही. आणि गुन्हाच घडला नाही तर आपोआप पोलिसांवरील अधिकचे ताण कमी होऊन शांतता निर्माण होण्याची संधी निर्माण होते. आता केवळ पोलिसांनी विचार करावा की मटका व जुगार व तसेच इतर अवैध धंदे बंद केल्यास आपोआप शांतता निर्माण होईल. व तसेच देगलुर पोलीस निरीक्षकांनी तात्काळ याची दखल घेत कार्यवाही करणे अपेक्षित आहे.