
दैनिक चालू वार्ता उपसंपादक परभणी- दत्तात्रय वामनराव कराळे
परभणी : अवैधरित्या सावकारीचा धुमाकूळ घालून अनेकांना वेठीस धरणाऱ्या काही सावकारांच्या घरावर शिताफीने धाड टाकून परभणीच्या सहायक निबंधकांनी प्रचंड खळबळ उडवून दिली आहे. धाडीमध्ये संबंधित पथकाला अवैध पध्दतीचं मोठं घबाड सापडल्याचा बोलबाला असून वास्तव ते काय असावे, याचे चित्र मात्र लवकरच स्पष्ट होऊ शकेल, असंही समजून येत आहे.
गंगाखेड तालुक्यातील महातपूरी येथे राजुबाई मुलगीर व शंभूदेव मुलगीर यांचा अवैधरित्या सावकारीचा धंदा असल्याची व त्यांनी अनेकांना वेठीस धरल्याची तक्रार मिळाली होती. या तक्रारीस अनुसरुन परभणी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था तथा सावकारांचे जिल्हा उपनिबंधक परभणी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निबंधक यांच्या पथकाद्वारे महातपूरी येथील कथित सावकारांच्या घरावर अत्यंत शिताफीने धाड टाकण्यात आली. या धाडीत सदर पथकाला अनेक बेनामी संपत्तीचे व अवैधरित्या सावकारीचे बरेच घबाड मिळाल्याचा बोलबाला आहे. त्याची सर्व तपासणी सुरू आहे. संबंधितांना त्यांची बाजू मांडण्याची मुभा देण्यात आली आहे. अवैध सावकारी, बेनामी मालमत्ता किंवा त्यासंबंधीचे कागदपत्र तथा सावकारीविषयीचे कोणतेही पुरावे आढळून आल्यास वा तशी सावकारी सिध्द झाल्यास त्यांच्यावर गुन्हे सुध्दा दाखल केले जाऊ शकतील अशी माहिती सदर पथकाकडून दिल्याचे समजते.
सदर अवैध सावकारी विषयी गंगाखेड मधील दत्तवाडी येथील एका व्यक्तीने तक्रार केल्याचे पुढे आले आहे. दरम्यान सदरच्या कारवाईच्या अनुषंगाने परभणीच्या जिल्हाधिकारी आंचल गोयल, जिल्हा पोलीस अधीक्षक रागसुध्दा आर. विभागीय सहनिबंधक योगीराज सुर्वे, जिल्हा उपनिबंधक उमेशचंद्र हुसे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निबंधक संदीप तायडे, एस्. एम्. कनसटवाड यांच्या पथकाने ही धाड टाकली होती. राजुबाई मुलगीर व शंभूदेव मुलगीर यांच्या घरावर टाकलेली ही धाड अत्यंत गोपनीय अशीच असायला हवी होती तथापि या धाडीची वल्गना अगोदरच कशी काय झाली त्यामुळे मात्र प्रचंड खळबळ माजली गेल्याचे म्हटले जात आहे.