
दैनिक चालू वार्ता वृत्तसेवा-
सैन्यदलात सेवा बजावलेले माजी सैनिक, युद्ध, युद्धजन्य परिस्थिती, देशातील सुरक्षा संबंधी मोहिमेत, चकमकीत, देशाबाहेरील मोहीमेत दिव्यांगत्व आलेले सैनिक, धारातीर्थी पडलेल्या शहीद सैनिकांचे वारस यांच्यासाठी अनेक कल्याणकारी योजना राबवून त्यांच्या त्यागाचा सन्मान करण्याचा प्रयत्न केला जातो. या विविध योजनांविषयी….
पुनर्वसन महासंचालनालय नवी दिल्ली, केंद्रीय सैनिक मंडळ नवी दिल्ली, राज्य शासन तसेच राज्य शासनाच्या सैनिक कल्याण विभागाकडून राज्य सैनिक मंडळअंतर्गत ‘कल्याणकारी निधी’ आणि राज्यपाल यांच्या अध्यक्षतेखाली गठित ‘विशेष निधी’ राज्य व्यवस्थापकीय समितीतून विविध योजना राबवल्या जातात.
*कल्याणकारी निधीतून मदत:*
*शहीद, मृत्युमुखी सैनिक, दिव्यांगत्व आलेल्या सैनिकांना मदत:* युद्धात, मोहिमेत धारातीर्थी पडलेल्या सैनिकांच्या कुटुंबियांना शासनातर्फे सानुग्रह आर्थिक मदत दिली जाते. त्याव्यतिरिक्त कल्याणकारी निधीतूनही त्यांना एकरकमी ४० हजार रुपये तात्काळ मदत दिली जाते. युद्धजन्य कारणाव्यतिरिक्त सेवारत सैनिकांचा मृत्यू झाल्यास ७५ हजार रुपये, दिव्यांगत्व आल्यास २० ते ५० टक्के दिव्यांगत्वासाठी साठी ४० हजार व ५१ टक्केपेक्षा जास्त दिव्यांगत्वासाठी ७५ हजार रुपये एकरकमी आर्थिक मदत दिली जाते.
*वैद्यकीय मदत:* विविध प्रकारच्या वैद्यकीय उपचारांसाठी तसेच वैद्यकीय उपकरणांसाठी आर्थिक मदत देण्यात येते. यामध्ये श्रवण यंत्र व दाताच्या कवळीसाठी ५ हजार रुपये, दिव्यांग सैनिकास तीनचाकी सायकलसाठी ८ हजार रुपये व स्वयंचलित मशीनसाठी १५ हजार रुपयांपर्यंत वेगळे अनुदान, दिव्यांग माजी सैनिक कुटुंबियांना कुबडी तसेच इतर वैद्यकीय उपकरणासाठी प्रत्यक्ष येणाऱ्या खर्चाइतकी आर्थिक मदत देण्यात येते.
माजी सैनिक व विधवा पत्नीला असाध्य प्रकारच्या गंभीर आजारासाठी दरमहा १ हजार रुपये व वार्षिक जास्तीत जास्त १० हजार पर्यंत. अर्धांगवायू आजार झाला असेल किंवा मूत्रपिंडाचे डायलिसिस सुरू असेल व सोबत दुसऱ्या व्यक्तीची गरज पडत असल्यास आर्थिक मदत दिली जाईल. एका डोळ्याच्या मोतिबिंदू शस्त्रक्रियेसाठी ५ हजार रुपये देण्यात येतात.
*मतिमंद व दिव्यांग पाल्यास:* माजी सैनिकांच्या मतिमंद किंवा ५० टक्केपेक्षा जास्त दिव्यांगत्व आलेल्या पाल्यास औषधोपचारासाठी दरमहा ३०० रुपये, शाळेत जाणाऱ्या मुलांसाठी दरमहा २०० रुपये, कौशल्य विकास प्रशिक्षणासाठी ६०० रुपये व स्वयंरोजगारासाठी कर्जाच्या ५० टक्के किंवा जास्तीत जास्त ३४ हजार रुपये इतके अनुदान मिळते.
*दिव्यांग माजी सैनिकास आर्थिक मदत:* ६५ टक्के दिव्यांगत्व आलेल्या माजी सैनिकाला घर दुरुस्तीसाठी किंवा घरात बदल करण्यासाठी ५० हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. ६५ टक्के किंवा जास्त अंधत्व आलेल्या माजी सैनिक/ विधवा यांना दरमहा २ हजार रुपये आर्थिक मदत करण्यात येते. पॅराप्लेजिक सेंटर खडकी येथे औषधोपचार घेत असलेल्या दिव्यांग माजी सैनिकांनाही दरमहा २ हजार रुपये आर्थिक मदत दिली जाते.
*अंत्यविधीसाठी आर्थिक मदत:* माजी सैनिक, त्याच्या पत्नीचे किंवा माजी सैनिकाच्या विधवेचे निधन झाल्यास अंत्यविधीसाठी १० हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात येते.
*घरकुल, घरबांधणी, सदनिका खरेदीसाठी आर्थिक मदत:* युद्ध विधवा तसेच सेवा बजावत असताना मृत्यूमुखी पडलेल्या सेवारत सैनिकांच्या विधवा यांना घरकुलासाठी १ लाख ५० हजार रुपये मदत देण्यात येते. माजी सैनिक व त्याच्या विधवेस घर बांधणीसाठी किंवा फ्लॅट खरेदीसाठी घेतलेल्या कर्जाच्या १० टक्के तथापि जास्तीत जास्त ५० हजार रुपये रक्कम परस्पर वित्तीय संस्थेस देण्यात येते.
*स्वयंरोजगार:*
स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण घेणाऱ्या माजी सैनिकास ३ हजार रुपयांपर्यंत प्रशिक्षण प्रतिपूर्ती रक्कम देण्यात येते. स्वयंरोजगार सुरू करण्यासाठी कर्जाच्या ५० टक्के किंवा जास्तीत जास्त ३ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येते. माजी सैनिकांना/ विधवांना स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहित करण्यासाठी इच्छुक माजी सैनिकांमधून अधीकृत प्रतिनिधी किंवा प्रवर्तक म्हणून नेमणूक करण्यात येते. माजी सैनिकांच्या पाल्यांना वाहनचालन प्रशिक्षणासाठी संस्थेच्या शुल्काच्या 50 टक्के तथापि, जास्तीत जास्त 1 हजार रुपये आर्थिक मदत देण्यात येते. (क्रमश:)