
दैनिक चालू वार्ता वृत्तसेवा-
नुकत्याच झालेल्या निवडणुकांचे निकाल आणि गुजरातमध्ये भाजपचा विक्रमी विजय याच्या चर्चा आणि विश्लेषणे पाहिल्यास तीन प्रश्न पडतात. एक, गुजरातमध्ये मोदींची जादू शिगेला पोहोचण्यामागील राजकीय गणित काय आहे? दुसरे, भाजप आणि मोदींच्या सर्व प्रयत्नांना न जुमानता हिमाचलमध्ये भाजपाचा पराभव आणि काँग्रेसचे पुनरागमन यामागचे गौडबंगाल काय आहे? आणि तिसरे, दिल्लीत आम आदमी पक्षाचा दणदणीत विजय. एमसीडीमध्ये दणदणीत विजय नोंदवून, गुजरातमध्ये पाच आमदारांसह खाते उघडून आणि तिथला मतदानाचा वाटा जवळपास 13 टक्क्यांवर नेऊन, ‘आप’ ने आता काँग्रेससाठी मोठा धोका बनल्याचे संकेत दिले आहेत का? योग्य अर्थाने बघितले तर ‘आप’च्या या जबरदस्त उदयाचा सर्वात जास्त फटका कोणाला बसला असेल तर तो काँग्रेसला बसला आहे.
राहुल गांधी ज्या प्रकारे ‘भारत जोडो’ यात्रेच्या माध्यमातून तळागाळातील जनतेशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत किंवा ज्या पद्धतीने काँग्रेसने मल्लिकार्जुन खर्गे यांना पक्षप्रमुख बनवून घराणेशाहीचे आरोप फेटाळले आहेत त्यावरून काँग्रेसमुक्त भारताच्या गप्पा मारणाऱ्या भाजपला काँग्रेससारख्या पक्षाला पूर्णपणे नेस्तनाबूत करणे अशक्य असल्याची जाणीव आहे. काँग्रेसला पूर्णपणे नेस्तनाबूत करणे तेव्हाच शक्य आहे जेव्हा विरोधी पक्षांमध्ये काँग्रेसची मते कमी करणाऱ्या पर्यायी पक्षांचा विस्तार होईल तेव्हाच. उत्तर प्रदेशात सपा आणि बिहारमध्ये आरजेडीने केलेल्या विस्ताराचा आधार वेगळा आहे. तिथे काँग्रेस उपेक्षित आहे ही दुसरी बाब आहे. मात्र ‘आप’ बाबत वेगवेगळ्या शक्यता दिसतात.
2017 ची गुजरात निवडणूक मोदी आणि शहा यांच्यासाठी मोठा धडा होती हे उघड आहे. अशा परिस्थितीत गुजरातमध्ये ‘आप’सारखा पक्ष त्यांच्यासाठी उपयुक्त ठरला, ज्यामळे काँग्रेसची अडचण झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची काही विधाने बघा. निवडणुकीपूर्वी आणि आता निकालानंतरही पंतप्रधान सातत्याने आपल्या भाषणांमध्ये काँग्रेसपेक्षा ‘आप’वर जास्त हल्ला करताना दिसतात. शॉर्टकटचे राजकारण करण्याच्या नावाखाली ते सतत आम आदमी पार्टीवर हल्लाबोल करत घोषणाबाजी करताना दिसतात. त्यासाठीची भूमिका कोरोनाच्या काळातच निर्माण झाली होती. तेव्हापासून केजरीवाल यांनी गुजरातमध्ये निवडणूक लढविण्याबाबत बोलणे सुरू केले आणि त्यांचे गुजरातचे दौरे वारंवार होऊ लागले. हिमाचलसाठीही हा प्रयत्न केला गेला, इथेही 67 जागांसाठी आप ने उमेदवार उभे केले, पण तेथील जनतेने त्यांना नाकारले. पंजाबमध्ये काँग्रेसच्या कमजोरीमुळे ‘आप’ने आपले अस्तित्व निर्माण केले होते, मात्र हिमाचलमध्ये काँग्रेसने ‘आप’ला स्थान मिळू दिले नाही.
आता दिल्लीत एमसीडीच्या विजयाने ‘आप’ला मोकळे मैदान मिळाले आहे. देशातला नंबर दोनचा पक्ष आणि प्रबळ विरोधी पक्ष बनवण्यासाठी आम आदमी पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जाही मिळाला आहे. दुसरीकडे, दिल्ली आणि गुजरातमध्ये काँग्रेसची मतांची टक्केवारी ज्या पद्धतीने कमी झाली आहे, ती पक्षासाठी निश्चितच चिंताजनक आहे. अशा परिस्थितीत काँग्रेसला इच्छा असूनही फारसे काही करता येणार नाही, कारण ‘आप’च्या निकालाने त्यांचे मनोधैर्य खचले आहे.
गुजरातच्या बम्पर निकालाने देशात आगामी काळात भाजपशिवाय पर्याय नाही हे सिद्ध करण्याचाही सातत्याने प्रयत्न सुरू असून 2024 सालीही भाजप प्रचंड बहुमताने सत्तेत परतणार आहे. मात्र, कुठेतरी हिमाचल प्रदेशच्या पराभवाने त्यांच्यातील अस्वस्थता नक्कीच वाढली आहे. राहुल गांधींच्या ‘भारत जोडो’ यात्रेसारख्या प्रयत्नांतून काँग्रेसला जे काही साध्य करता येईल, ते काँग्रेसच्याच इच्छाशक्ती आणि संघटनात्मक प्रयत्नांवरून निश्चित होईल. आणि काँग्रेससमोर तसे हे आव्हानच आहे, कारण तुम्ही ‘नंबर दोनचा पक्ष’ म्हणून दिसणे हे भाजपच्या हिताचे आहे. सध्या सर्वांच्या नजरा पुढील वर्षी होणाऱ्या काही राज्यांच्या विधानसभा निवडणुकांवर आणि 2024 मध्ये आप आणि भाजपला शह देण्यासाठी काँग्रेस समोर असलेल्या मोठ्या आव्हानांवरही आहेत.
– मनोहर चांदणे