
दैनिक चालू वार्ता प्रतिनीधी -संतोष भसमपुरे …
सविस्तर वृत्त असे की अहमदपूर तहसील कार्यालयातील संजय गांधी निराधार योजनेच्या विभागात राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेच्या लाभाकरिता तालुक्यातील विविध भागातील नागरिकांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज केलेले असून त्याचे ऑफलाईन प्रस्ताव विभागात जमा केले आहेत .सहा महिन्यापासून सदर प्रस्तावावर आणि आवेदनावर शासकीय स्तरावर आजपर्यंत कुठलीही कार्यवाही झाली नाही .
याबाबत विचारणा केली असता सदरील विभागाच्या कर्मचारी वर्गाकडून निधी उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले.निधी अभावी प्रस्तावावर कुठलीही कार्यवाही अथवा निर्णय घेण्यात आले नाही असे सांगण्यात आले.
दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील मृत पावलेल्या व्यक्तींच्या वारसांना सदर योजनेतून अर्थसहाय्य देण्याची तरतूद असून सहा सहा महिने त्यावर शासन निर्णय घेत नाही ही बाब चिंताजनक आहे.
कार्यालयात सहा महिन्यापासून खेटे घालणाऱ्या नागरिकांनी सदर गोष्टी बाबत संताप व्यक्त केला आहे. आर्थिक दृष्ट्या सक्षम नसलेल्या व्यक्तींना तहसील मध्ये पाठपुरावा करण्यासाठी ग्रामीण भागातून ये जा करत करत सहा महिन्याचा कालावधी उलटला तरी त्यांच्या अर्जावर अजून कुठलाही निर्णय झाला नाही .कार्यालयातील कर्मचारी वर्ग देखील निधी अभावी काम होत नसल्याचे बोलून दाखवले .त्यामुळे सदर विभागाला तात्काळ निधी उपलब्ध करून द्यावा अशी जनतेची मागणी आहे.