
दैनिक चालू वार्ता उपसंपादक परभणी- दत्तात्रय वामनराव कराळे
परभणी : एका बाजूला जिल्ह्यात वाढते नागरीकरण, रहदारी व औद्योगिकीकरण तर दुसऱ्या बाजूला दिवसेंदिवस वाढणारा गुन्हेगार आणि गुन्हेगारीचा रेषो हतबल करणारा ठरतो आहे. परभणी पोलिसांची मानवीय शक्ती अपूरी असली तरी गहाळ मोबाईलच्या शोधासाठी भरीव अशी युक्ती वापरुन गुन्हेगारीवर कमालीची मात केली आहे, असं म्हटलं तर मुळीच चुकीचं ठरणार नाही. तद्वतच मागील वर्षभरात गहाळ ३४१ मोबाईलचा याच सायबर सेलने शिताफीने शोध लावून सायबर सेलला साजेशी आणि उल्लेखनीय अशीच कामगिरी केली आहे असेच म्हणावे लागेल.
सन २०२२ मध्ये परभणी जिल्ह्यात एकूण ६१२ मोबाईल गहाळ झाले होते. पैकी ३४१ मोबाईलचा शोध लावण्यात या पथकाला यश आले आहे. आज दि. ३१ डिसेंबर रोजीच्या पत्रकार परिषदेत पोलीस अधीक्षक रागसुधा आर. यांनी ही माहिती दिली आहे. २३ डिसेंबर ते ३१ डिसेंबर या दरम्यान राबविलेल्या विशेष मोहिमेत साडे सात रुपये किंमतीचे ५२ मोबाईल हस्तगत करुन ते मूळ मालकांच्या स्वाधीन करण्यात आली आहेत.
परभणी शहरातील रेल्वे स्थानक परिसर, एस्.टी.स्थानक परिसर, आठवडी बाजार परिसर, शाळा-कॉलेज परिसर, भूसार व कापड बाजार परिसर आदी वर्दळीच्या ठिकाणाहून मोबाईल चोरीचे प्रमाण मागील वर्षभराच्या कालावधीत घडले आहेत. नोंदविलेले गुन्हे आणि लोकांच्या वाढत्या तक्रारी लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक रागसुधा आर. यांनी सदर मोबाईल शोधण्याचे आदेश सायबर सेलची या पथकाला दिले होते. नवा होंडा पोलीस ठाणे-१६, नानलपेठ-१२, कोतवाली-१०, जिंतूर पोलीस ठाणे-४, सेलू-७, सोनपेठ-२ आणि मानवत पोलीस ठाणे-१ असे एकूण ५२ मोबाईल हस्तगत करण्यात यश मिळवले आहे तर सन २०२२ मध्ये १०४ मोबाईल हस्तगत करुन तेही ज्यांचे होते, त्यांना परत केले.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक रागसुधा आर. आणि अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या शोध मोहिमेत पोलीस निरीक्षक संदीपान शेळके, समाधान चवरे, शरद जऱ्हाड, रावसाहेब गाडेवाड, सपोनि. संदीप बोरकर, कोकाटे, सायबर सेल पोलीस ठाण्याचे सपोनि. गुलाब बाचेवाड यांच्यासह पोलीस कर्मचारी बालाजी रेड्डी, रवी भूमकर, राजेश आगाशे, गौस पठाण, रंजीत आगळे, स्वप्नील पोतदार, राम घुले, गणेश कौटकर, संतोष व्यवहारे आदींचा यात समावेश होता.
तक्रार कुठे व कशी नोंदवणार
“”””””””””””””””””””””””””””””””””””””
परभणी पोलीस अधीक्षक कार्यालयात सन २०१७ पासून सायबर सेल पोलीस ठाणे कार्यान्वित करण्यात आले आहे. या पोलीस ठाण्यात १ जानेवारी पासून नागरिकांना तक्रार नोंदविता येणार आहे. नागरिकांच्या सेवेसाठी या पोलीस ठाण्यात एका अधिकाऱ्यासह एकूण नऊ जणांचे कर्मचारी पथक कार्यरत करण्यात आले आहे. ऑनलाईन फसवणूक, माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत येणारे गुन्हे दाखल करता येणार आहेत, ज्यामुळे या गुन्हेगारीलाही आळा घालणे शक्य होईल. असे पोलीस अधीक्षक यांच्या निर्देशातून स्पष्ट होत आहे.