
दैनिक चालू वार्ता उपसंपादक परभणी- दत्तात्रय वामनराव कराळे
परभणी : अखेर परभणी शहरात दिव्यांगांच्या विविध स्पर्धा आयोजित करुन त्यांचा आनंद द्विगुणित करण्याचे अहोभाग्य उशिरा का होईना परंतु लाभले गेले. त्यामुळे सर्वत्र आनंद व्यक्त केला जाणे स्वाभाविक आहे. ३ डिसेंबर रोजी राष्ट्रीय अपंग दिनाच्या औचित्यावर या स्पर्धा भरविणे अपेक्षित होते. तथापि कोणतेही कारण न देता त्या स्पर्धाच भरविल्या गेल्या नव्हत्या. जि.प.अंतर्गत समाजकल्याण विभागाच्या त्या अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करुन त्यांना तात्काळ निलंबित केले जावे अशी मागणी चालू वार्ता या दैनिकाने यापूर्वीच लावून धरली होती. त्याचाच परिपाक म्हणून आजच्या या स्पर्धा आयोजित केल्या असाव्यात अशीही खुमासदार चर्चा परभणीत कित्येकांच्या वाणीतून ऐकावयास मिळाली गेली. हे परमभाग्यच म्हणायचे. शासनाचा सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभाग, जिल्हा परिषद समाजकल्याण विभाग आणि जिल्हांतर्गत दिव्यांगांच्या शाळा व कर्मशाळा यांच्या समन्वयातून आज उद्घाटन करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय विविध क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रम दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी प्रोत्साहित करणाऱ्याच ठरु शकतील. या स्पर्धांचे उद्घाटन जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मून यांच्या हस्ते करण्यात आले.
जिल्ह्यातील २९ शाळांमधील ज्या विद्यार्थ्यांनी या स्पर्धांमध्ये सहभाग घेतला आहे, त्यात ६१४ अस्थिव्यंग, मुकबधीर, मतीमंद वर्गाचा समावेश आहे. त्या सर्वांनी आपल्या अंगी असलेल्या सुप्त कला-गुणांचा आविष्कार सादर करुन त्यांनी उपस्थितांची मने जिंकली आहेत. त्यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मून, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण विभागाच्या गीता गुट्टे, जिल्हा क्रीडा अधिकारी नरेन्द्र पवार यांच्यासह उपस्थित असंख्य अधिकारी व मान्यवरांनी उत्फुर्तपणे दाद दिली.
विविध स्पर्धांच्या माध्यमातून दिव्यांग, अपंग, मूकबधिर विद्यार्थ्यांना जर प्रोत्साहित केले गेले आणि वारंवार संधी
उपलब्ध करुन दिली तर ते नक्कीच संधीचे सोने करतील असा विश्वास ठेवायला मुळीच हरकत नसावी.
,