
दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी -श्रीकांत नाथे
अमरावती:- पहिल्या महिला शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती बालिका दिन म्हणून आज दिनांक ३ जानेवारी २०२३ मंगळवार रोजी सर्वज्ञ बहुउद्देशीय संस्था शिंदी बु. द्वारा संचालित स्व.दिगंबर पेटकर आश्रम शाळा अंजनगाव सुर्जी येथे माजी आमदार स्व.शंकरराव बोबडे यांच्या ज्येष्ठ सूनबाई सौ.वर्षाताई विदर्भकुमार बोबडे यांच्या अध्यक्षतेखाली साजरी करण्यात आली.यावेळी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व हारार्पण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेल्या सौ.वर्षाताई विदर्भकुमार बोबडे,प्रमुख वक्ता सौ.सीमाताई बोके,प्रमुख अतिथी सौ.राधाताई ढेपे,सौ.सविताताई पेटकर,सौ.रंजनाताई वासनिक आणि सत्कारमूर्ती सौ.संगीताताई अपाले यांनी केले.
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे स्त्री शिक्षणातील योगदान,त्यांचे कार्य समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे.ही गरज ओळखून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती यावेळी स्व.दिगंबर पेटकर आश्रम शाळा अंजनगाव सुर्जी येथे ३ जानेवारीला शासकीय नियमानुसार घेण्यात आला असे यावेळी सौ.वर्षाताई बोबडे त्यांच्या अध्यक्षीय भाषणात म्हणाल्या.
थोर समाज सुधारक शिक्षक तज्ज्ञ क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा ३ जानेवारी हा जन्मदिवस राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमाच्या शाळांमध्ये तसेच शासकीय,निमशासकीय कार्यालयात महिला शिक्षक दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे आणि सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिनी शिक्षण विभागामार्फत विविध उपक्रम,कार्यक्रम साजरे करण्याबाबतचा आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.सर्व शासकीय निमशासकीय कार्यालय,सर्व शाळा महाविद्यालयात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात यावे,प्रत्येक विद्यार्थी व शिक्षकांनी त्यांच्या कार्याविषयी एक पुस्तक वाचण्याचा संकल्प करावा,त्यांच्या कार्यावर आधारित व्याख्यानाचे आयोजन करणे,विद्यार्थ्यांचा गट करून क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्याविषयी चर्चासत्रे,ऑनलाईन सेमिनार आयोजित करून स्त्री शिक्षणाचे महत्व,त्यांचे स्फूर्तिदायी लेखन व विचार यावर परिसंवादाचे आयोजन करणे,महिला शिक्षिका,अधिकारी,सामाजिक कार्यकर्ते यांनी स्त्री शिक्षणातील महत्त्व लक्षात घेऊन त्यांचा गौरव करणे,क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनातील घडलेल्या विविध घटकावर आधारित पथनाट्य,एकपात्री प्रयोग याचे आयोजन करणे,त्यांच्या जन्मदिनानिमित्त राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या माध्यमाच्या इयत्ता पहिली ते बारावीमधील सर्व विद्यार्थ्यांनी भाषणे,वक्तृत्व स्पर्धा,निबंध लेखन,परिसंवाद,एकांकिका यासारखे उपक्रम राबवून त्यांचे विचार आचरनात आणावे असे ह्यावेळी प्रमुख वक्ता सौ.सिमाताई बोके आपल्या भाषणातून उपस्थित विद्यार्थी,विद्यार्थिनी,शिक्षक,शिक्षिका,कर्मचारी,सामाजिक कार्यकर्ते यांना संबोधले.
तसेच यावेळी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व आई जिजाऊ यांच्या जयंतीचे औचीत्य साधून विद्यार्थिनींनी त्यांची वेशभूषा साकारून कार्यक्रमाचे आकर्षण ठरले तसेच महीला सत्कारमूर्ती,काकडा येथील नवनियुक्त सरपंच सौ.संगीताताई अपाले यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.