
दैनिक चालू वार्ता उपसंपादक परभणी- दत्तात्रय वामनराव कराळे
परभणी : परभणी शहर वाहतूक शाखेने सन २०२२ या वर्षभरात सुमारे पावणे चार कोटी रुपयांचा दंड वसूल केला आहे. बेशिस्त वाहनधारकांना कायद्याचा इंगा दाखवत कठोर कारवाईचा बडगा उगारला ज्यामुळे शहर वाहतूक खात्याच्या तिजोरीत झालेली वाढ ही कौतुकास्पद अशीच म्हणावी लागेल.
सन २०२२ या एका वर्षात शहर वाहतूक शाखेने ४८ हजार ७१९ वाहनांवर केसेस दाखल दाखल करुन ३कोटी ६१ लाख ७८ हजार ४५० रुपये आर्थिक दंड वसूल केला आहे. ऑनलाईन व प्रत्यक्ष पध्दतीने केलेल्या कारवाईत वाहतूक पोलीस खात्याच्या तिजोरीत कमालीची भर पडली असली तरी बेशिस्त वाहनधारकांनी यातून किती बोध घेतला असेल ते त्यांचं त्यांनाच ठाऊक ?
परभणी शहर व परिसरात अगदी भरधाव वेगाने वाहने चालवून आपले व इतरांचे जीव धोक्यात घालणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस अधिकच वाढली जात आहे. अनेकांचे जीव जात आहेत. कित्येकांचे संसार उध्वस्त झाले आहेत. परिणामी कित्येक आया-भगिनींना वैधव्य पत्करावे लागले आहे. कित्येकजण गंभीर दुखापती होऊन त्यात ते अपघातग्रस्त बनले गेले आहेत. तरीही काही अपवाद वगळता कित्येकांना बेशिस्त ही रक्तातच भिणल्यासारखे अजूनही बेदरकार, बेफाम गाड्या चालवताना आढळून येत असते. त्यांना शिस्त लागावी, तसे वाहनधारक अथवा त्यांच्यावर निर्भर अथवा परिवारातील अन्य घटक यांना कोणतीही समस्या उद्भवली जावू नये यासाठी कर्तव्यावरील पोलीस शिस्त लावण्याचा वाहतूक कायद्याचे पालन करण्याचा तगादा लावत असतात. कदाचित त्यांच्या त्या शिस्तप्रिय शिकवणीचा अशा बेदरकार वाहने चालवणाऱ्या ना रागही येत असेल, परंतु ती शिकवण तुम्हा-आम्हा सर्वांच्याच हिताची ठरणारी असते याचे कोणालाही विस्मरण होता कामा नये. अन्यथा अशा दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागते यात शंकाच नसावी. याही पुढे जाऊन सांगायचे झाल्यास त्यात आपला जीवही गमावला जाऊ शकतो ज्यामुळे परिवारावर भयान असे संकट ओढवले जाते. म्हातारी मेल्याचे दु:आ नसावे परंतु काळ सोकावता कामा नये एवढे मात्र खरे.
वसमत महामार्गावर कारवाई
“””””””””””””””””””””””””””””””””””””
वसमत महामार्गावर सुध्दा अशाच प्रकारची दंडात्मक कारवाई करुन भरधाव वेगाने वाहने चालवणाऱ्यांना शिस्तीचा बडगा दाखवण्याचा जो प्रयत्न वाहतूक पोलिसांनी केला आहे तो स्तूत्य असाच म्हणावा लागेल.
अल्पवयीन वाहनधारक व नियमांचे पालन न करणाऱ्या बेशिस्त वाहन धारकांकडून रुपये १ लाख, दहा हजारांचा दंड या पथकाने वसूल केला आहे. त्यामुळे वाहनधारकांमध्ये प्रचंड खळबळ माजली गेली असली तरी नियमांचे मात्र काटेकोरपणे पालन न होता त्याचे विस्मरण पडत असल्याचे यावरुन दिसत आहे.
बेदरकारपणे वाहने चालवून मोठ्या प्रमाणात होणारे अपघात, त्यात जाणारे अनेकांचे जीव, परिणामी उघड्यावर पडणारे संसार, नाईलाजाने पत्करावे लागणारे वैधव्य आणि संबंधित घरांवर कोसळणारे संकट लक्षात घेऊन चालू वार्ता या मराठी दैनिकाने सातत्याने आवाज उठवला आहे. भरधाव वेगाने वाहने चालवून आपले जीव धोक्यात घालून परिवारावर संकट आणू पहाणाऱ्यांना शिस्त लावण्यासाठी कायद्याचा कठोर बडगा उगारला जावा यासाठीचे आवाहन वृत्तांकनाद्वारे करीत आलो आहे. त्याचाच परिपाक म्हणून पोलीस बांधवांनी ही कारवाई करुन लाखोंचा दंड वसूल केला असावा. तथापि अशा प्रकारची कोणतीही कारवाई करण्याची वेळच न आणता वाहनधारकांनी वाहतूक नियमांची पायमल्ली न करता पालन करावे आपले बहुमोल असे जीवन दीर्घकाळ जगावे असेच या निमित्ताने सांगावेसे वाटते.