
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा –
नवी दिल्ली : कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांना भारत जोडो यात्रेवरून उत्तरप्रदेशातून अनपेक्षित पाठिंबा मिळाल्याचे पाहावयास मिळाले. त्याचा संदर्भ घेऊन कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी योगींच्या प्रदेशात हवामान बदलाचे संकेत आहेत का, अशा आशयाचा मिश्कील सवाल केला.
अयोध्येतील रामजन्मभूमी मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांनी नुकतेच राहुल यांना पत्र पाठवून त्यांच्या यात्रेस पाठिंबा दर्शवला.
त्यापाठोपाठ विश्व हिंदू परिषदेचे नेते चंपत राय यांनी पदयात्रा काढल्याबद्दल राहुल यांची प्रशंसा केली. त्याशिवाय, उत्तरप्रदेशात बुधवारी एका ठिकाणी भाजपच्या कार्यालयात उपस्थित असणाऱ्या त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी यात्रेत सहभागी झालेल्यांचे हात हलवून अभिवादन केले. त्या तीन घटनांचा संदर्भ देऊन रमेश ट्विटरवरून व्यक्त झाले. भाजपचे नेते योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री असलेल्या उत्तरप्रदेशात कुठले बदलाचे वारे वाहत आहेत का, अशा आशयाचा सूचक सवाल त्यांनी केला.