
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी मंठा -सुरेश ज्ञा. दवणे
मंठा ग्रामपंचायत स्तरावर गरजू पशुपालकांना गोठा बांधकामासाठी अनुदान मिळावे यासाठी राज्य शासनाने डिसेंबर २०२० मध्ये शरद पवार ग्रामसमृध्दी योजना सुरू केली. मंठा तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या माध्यमातून या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी व पशुपालकांनी शेकडो प्रस्ताव पंचायत समितीमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, मोजक्याच शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाल्याने प्रस्ताव दाखल केलेल्या पशुपालकांमधून रोष व्यक्त केला जात आहे. अनेक प्रस्ताव कार्यालयात धुळखात पडून आहेत.
गाव पातळीवर अनेक शेतकरी जोडधंदा म्हणून पुशपालन करतात – अलिकडे काही शेतकरी कुक्कट पालनाकडेही वळले आहेत. या शेतकऱ्यांच्या पशुसांठी शास्त्रीय पध्दतीने गोठा मिळावा यासाठी शासनाने शरद पवार ग्राम समृध्दी योजना सुरू केली आहे. नापेड कंपोस्ट खतासाठी हौद, वृक्ष
लागवड आदी बाबींचा या योजनेत समावेश आहे. जनावरांसाठीच्या या गोठ्यासाठी पुशपालकांना ७७ हजार रुपयांपर्यंत अनुदान मिळणार आहे. तसेच कुक्कूटपालन शेड व अन्य कामांसाठी अनुदान देण्याचे योजनेत समाविष्ट आहे. या योजनेसाठी मंठा पंचायत समितीने ग्रामपचायतींमार्फत प्रस्ताव मागितले होते. त्यामुळे पुशपालकांनी ग्रामपंचायतींच्या माध्यमातून कागदपत्रांची पूर्तता
करून प्रस्ताव सादर केले. यातील काही प्रस्तावांना मंजुरी मिळाली आहे. तर काही प्रस्ताव धूळखात पडून आहेत. त्यामुळे पाठपुरावा करूनही प्रस्ताव मंजूर होत नसल्याने पशुपालक शेतकरी त्रस्त झाले आहेत यात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून कामे मार्गी लावण्याची मागणी पशुपालक शेतकरी करीत आहेत