
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा –
मुंबई : वेगवेगळ्या पेहरावावरून चर्चेत राहणाऱ्या उर्फी जावेदच्या प्रकरणावरून राज्य महिला आयोगावर टीका करणाऱ्या भाजप नेत्या चित्रा वाघ यांनाच आता महिला आयोगाकडून नोटीस बजवण्यात आली आहे.
वाघ यांनी महिला आयोगावर तथ्यहीन टिप्पणी करून, अयोगाची अप्रतिष्ठा केली आहे. याबाबत आता येत्या दोन दिवसात वाघ यांनी खुलासा करावा अन्यथा त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असा इशाराही या नोटिशीत दिला आहे.
महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी वाघ यांना बजावलेल्या या नोटिशीमुळे येत्या काळात चाकणकर विरुद्ध चित्रा वाघ संघर्ष चिघळण्याची शक्यता आहे. भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी ऊर्फी जावेद हिच्या पेहरावावरून आक्रमक भूमिका घेत ऊर्फीवर कारवाईची मागणी वाघ यांनी केली आहे. महिला आयोगाने स्वत:हून कारवाई का केली नाही, असा प्रश्न करत त्यांनी चाकणकर यांच्यावर टीका केली होती. त्यामुळे आता आयोगाकडून चित्रा वाघ यांना नोटीस बजावण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची अप्रतिष्ठा होईल, अशी वक्तव्य केली आहेत. तसेच, दोन महिलांच्या विभिन्न प्रकरणांची हेतुपुरस्सर तुलना करून दोन समाजात तेढ निर्माण करणारी वक्तव्य केली असल्याचे आयोगाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे आयोगाचा अवमान केल्याप्रकरणी दोन दिवसात खुलासा सादर करावा. अन्यथा याप्रकरणी आपले काही एक म्हणणे नाही, असे गृहीत धरुन एकतर्फी कार्यवाही करण्यात येईल, असे वाघ यांना पाठविण्यात आलेल्या नोटिशीमध्ये नमूद करण्यात आले आहे.