
दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती :- मकर संक्रांतीचा सण तोंडावर आल्याचे पाहता शहर पोलीसांनी चायना मांजा विक्रेत्यांवर करडी नजर ठेवली आहे.तसेच कुरिअर व ऑनलाईनव्दारे चायना मांजा खरेदी करणाऱ्यावर सुध्दा पोलीस विशेष लक्ष ठेवून आहेत.तसेच चायना मांजा खरेदी-विक्री करताना अथवा पुरवठा करताना कोणी आढळल्यास संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल,अशी तंबी पोलीस आयुक्त डॉ.नवीनचंद्र रेड्डी यांनी दिली आहे.
नायलॉन मांजाच्या वापरामुळे शहरातील बऱ्याच नागरिकांना गंभीर स्वरुपाच्या जखमा होतात.गळा कापणे,चेहरा विद्रूप होणे,नाक,कान व गालावर गंभीर जखमा होण्याच्या घटना घडतात.तसेच दुचाकीत मांजा अडकून गंभीर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.नायलॉन मांजा नागरिकांच्या जीविताला व आरोग्याला धोका निर्माण करतो.तसेच नायलॉन मांजा रस्त्यावरील खांबाला किंवा झाडाला अडकून राहतो.त्याने पर्यावरणास धोका संभवतो.यंदाचा मकर संक्रांतीचा सण जवळ आल्याचे पाहता सार्वजनिक शांतता व सुरक्षितता अबाधित ठेवण्याकरिता पोलीस आयुक्तांनी शहरातील नागरिक व व्यावसायिकांना नायलॉन मांजा,प्रतिबंधित साहित्य,ऑनलाइन ई-कॉमर्स वेबसाईटद्वारे पुरविण्यास तसेच नायलॉन मांजा कुरिअरद्वारे वाहतूक करण्यास मनाई आदेश जाहीर केले आहेत.