
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी जव्हार -दिपक काकरा.
बविआचे तहसीलदारांना निवेदन
जव्हार:-तालुक्यातील ग्रामीण शेतकऱ्यांना खरीप हंगामातील शेतीची कामे उरकल्यानंतर या शेतकऱ्यांना रोजगारासाठी प्रचंड धावाधाव करावी लागते.अशावेळी कुटुंबासहित स्थलांतरित होत मोठ्या शहरात जाऊन पोटाची खळगी भरली जात असण्याचे काम पिढीजात सुरू होत असे परंतु शासनाच्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनाच्या सहाय्याने येथील मजुरांना अगदी गावातच काम उपलब्ध होत असून रोजगार उपलब्ध झाल्याने कुटुंबासाठी आर्थिक हातभार लागण्यात मदत होत आहे.परंतु तालुक्यातील भौगोलिक परिस्थितीचा विचार केल्यास डोंगरदऱ्या,चढ-उतार अशी परिस्थिती असल्यामुळे रोजगार हमीची कामे करीत असताना इंटरनेट सुविधा उपलब्ध झाली नाही तर मजुरांची हजेरी लागत नाही म्हणून बहुजन विकास आघाडीचे जव्हार तालुका अध्यक्ष तथा झाप ग्रामपंचायतीचे सरपंच एकनाथ दरोडा यांनी जव्हार तहसीलदार आशा तामखडे यांना मजुरांची ऑफलाईन हजेरी घेऊन ती ग्राह्य धरण्यात यावी या आशयाचे निवेदन देत मागणी केली आहे.
रोजगार हमी योजनेची कामे इंटरनेट किंवा मोबाईलची रेंज नसलेल्या ठिकाणी सुरू असल्याने काही मजुरांची हजेरी ऑनलाइन लागत नसल्याची माहिती दरोडा यांना कळल्यानंतर त्यांनी तात्काळ तहसील कार्यालयात धाव घेऊन तालुक्यातील रोजगार हमीच्या मजुरांच्या बाबत निवेदन देऊन त्यावर योग्य ती कारवाई करण्याचे आवाहन केले आहे.तालुक्यातील शिक्षित अगर अशिक्षित कामगारांना आपल्या गावामध्ये रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध झाल्याने गेल्या दोन ते तीन वर्षांपासून तालुक्यातील आर्थिक परिस्थिती बदलत चालली आहे.याकरिता प्रशासन स्तरावरती पंचायत समितीचे गटविकास अधिकारी समीर वाठारकर,महसूल विभागाच्या तहसीलदार आशा तामखडे,कृषी विभागाचे वसंत नागरे तर वन विभागाचे काही अधिकारी
यांच्या समन्वयाने तालुक्यात रोजगार हमीची कामे योग्य प्रकारे सुरू असून त्यासाठीचा मोबदला देखील मजुराच्या खात्यावर जमा होत आहे.
रोजगार हमी योजनेच्या कामावर आल्यानंतर मजुरांची हजेरी ऑफलाइन घेऊन त्यानंतर नेटवर्क परिसरात जाऊन हजेरी अपलोड करता येते.त्यामुळे मजुरांनी मनात हजेरी सुटण्याचा चिंता बाळगू नये.
आशा तामखडे,तहसीलदार ,जव्हार