दैनिक चालु वार्ता इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे
सामाजातील प्रामाणिकपणा हरवत चालला असल्याचे जागोजागी दिसत असले तरीही एखाद्याला सापडलेला ऐवज प्रामाणिकपणे परत करण्याच्या घटनाही समोर येत असल्याने नैतिकता शिल्लक असल्याची ही पावतीच समजावी लागेल. याचीच प्रचिती इंदापूर येथील युवक विकास शिंदे यांनी दिली. रस्त्यावरती सापडलेले एटीएम, आधार कार्ड आणि मोबाईल त्यांनी संबंधित शेतकऱ्यास परत केले. त्यांच्या या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
याबाबत माहिती अशी, की वनगळी येथील शेतकरी राजेंद्र परशुराम सरडे हे आपली पत्नी नीता राजेंद्र सरडे यांना घेऊन इंदापूर या ठिकाणी मकर संक्रांतीची खरेदी करण्यासाठी आले होते, त्यांनी खरेदी केल्या नंतर खिशातील पैसे संपल्यावर मोबाईल वरून फोन पे करण्यासाठी मोबाईल बघितला असता त्यांना मोबाईल खिशामध्ये आढळून आला नाही, आपला मोबाईल पडल्याची खात्री त्यांना झाली आणि यानंतर त्यांनी मोबाईल कुठे पडला याचा शोध एक तास ते दीड तास संपूर्ण शहरांमध्ये ज्या ज्या ठिकाणी ते खरेदीसाठी गेले होते त्या ठिकाणी जाऊन शोध घेतला असता कुठेही त्यांना मोबाईल मिळाला नाही या मोबाईल बरोबरच मोबाईलच्या कव्हर मध्ये एटीएम आणि त्यांचे आधार कार्ड होते ते ही पडले होते.
यानंतर त्यांनी रामा कासार येथील काम करत असणाऱ्या कामगाराच्या मोबाईलवरून त्यांच्या फोनवरती संपर्क साधला असता इंदापूर येथील माळी महासंघाचे पुणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष विकास शिंदे यांनी कॉल उचलून आपले आधार कार्ड, एटीएम आणि मोबाईल मला मेन रोड इंदापूर, खडकपुरा येथील उत्कर्ष ज्वेलर्स च्या समोर सापडला आहे.आपण कसलेही काळजी करू नये असे सांगितले.
विकास शिंदे यांनी मोबाईल सापडल्यानंतर सोशल मीडियामध्ये लगेचच याबाबत एक पोस्ट टाकून संबंधित व्यक्तीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला होता. हे जर आपल्या ओळखीचे असतील तर कृपया माझ्याशी संपर्क साधावा अशी त्यांनी सोशल मीडिया वरती पोस्ट केली होती. त्यांनी त्या मोबाईलवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु मोबाईलला लॉक असल्याने आणि मोबाईल मध्ये चार्जिंग कमी होती त्यामुळे लवकरात लवकर कोणाचा या नंबर वरती फोन येईल याची ते वाट बघत बसले होते.
या मध्यंतरीच्या वेळेमध्ये विकास शिंदे यांनी इंदापूर तालुका काँग्रेस ओबीसी सेलचे तालुका अध्यक्ष बापूसाहेब बोराटे यांच्याशी संपर्क साधून झालेल्या घटनेची माहिती त्यांना दिली आणि लगेचच बापूसाहेब बोराटे यांनी विकास शिंदे यांना आपण इंदापूर पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा अथवा आपण त्या ठिकाणी जाऊन पोलीस स्टेशन मार्फत त्या व्यक्तीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करावा अशी विनंती केली.
यानंतर विकास शिंदे यांनी पोलीस स्टेशन इंदापूर या ठिकाणी जाऊन संबंधित शेतकरी राजेंद्र परशुराम सरडे यांना पोलीस स्टेशन या ठिकाणी येण्याची विनंती केली आणि आपले सापडलेले एटीएम आधार कार्ड आणि हजार रुपये किमतीचा मोबाईल त्यांना परत केला त्यांच्या या प्रामाणिकपणा बद्दल सहायक पोलिस निरीक्षक नागनाथ पाटील, पी एस आय पाडोळे साहेब, आणि पोलीस नाईक अनिल शेवाळे यांनी कौतुक करून त्यांचे अभिनंदन केले.
संबंधित घटना समजल्या नंतर दैनिक चालू वर्षाच्या प्रतिनिधींनी विकास शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी वरील माहिती दिली आणि मी आजपर्यंत समाजातील होणाऱ्या अन्याय, अत्याचार आणि भ्रष्टाचारा विरोधात लढत आहे आणि इथून पुढेही लढत राहणार आहे असे सांगितले समाजामध्ये काही ठिकाणी चुकीच्या घटना घडतील त्या ठिकाणी मी आवाज उठवून सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्याचा प्रमाणिकपणे प्रयत्न करत आहे, ही प्रामाणिकपणाची प्रेरणा मला माझी आई रुक्मिणी पांडुरंग शिंदे यांच्याकडून मिळाली असल्याचे विकास शिंदे यांनी सांगितले. विकास शिंदे यांच्या प्रामाणिकपणाबद्दल सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे .


