
दैनिक चालू वार्ता नांदेड प्रतिनीधी- प्रा.यानभुरे जयवंत सोपानराव
मातृत्वाचा उच्चतम आदर्श, स्वराज्याची राजमाता, स्वराज्याच्या मार्गदर्शिका, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई म्हणजे जिजाऊ. हे आपणा सर्वांनाच माहित आहे. परंतु या व्यतिरिक्त जिजाऊंनी समाजाच्या उन्नतीआड येणाऱ्या अनेक जुनाट रुढी नाकारून नवीन पायंडे घातलेत, समाजात नवीन विचार रुजवीला. जवळपास ४०० वर्षांपूर्वीच्या काळाचा विचार केला तर अनेक धार्मिक अंधश्रद्धा, वाईट रुढी, जातीभेद शिगेला पोहोचले होते. याविरुद्ध आवाज काढणे धर्मविरोधी कृत्य ठरवून धर्मातून – जातीतून वाळीत टाकल्या जायचे. अशा काळात जिजाऊंनी स्वतः पासून काही जुनाट रूढींना छेद देऊन सुधारणा केल्यात व त्या प्रजेच्या गळी सुद्धा उतरविल्या. प्रजेने त्या स्विकारल्या म्हणून ४०० वर्षाआधी होऊन गेलेल्या जिजाऊंना समाजसुधारक म्हणणे अतिशयोक्ती होणार नाही. कदाचित अनेकांना जिजाऊंना समाजसुधारक म्हणणं पटणार नाही. कारण जिजाऊ आणि समाजसुधारणा ही कल्पनाच आपण केलेली नाही. जिजाऊंनी केलेल्या अनेक सुधारणांपैकी आपण इथे त्यांच्या २-३ सुधारणाविषयक कार्यांचा उल्लेख केल्यावर जिजाऊ ह्या एक समाजसुधारक होत्या. असं आपण नक्कीच म्हणणार.
शापित भूमी नांगरली :- जिजाऊ व बालशिवबा सन १६४१ ला बंगलोर वरून पुण्याला आले. परंतु पुण्यात गावाचे व माणसाचे अस्तित्व नव्हते. आदिलशहाने पुण्यावरून गाढवाचा नांगर फिरवून लोखंडी पहार रोवून त्यास तुटलेली चप्पल, केरसुणी आणि फुटकी कवडी अडकवून पुणे बेचिराख केले होते. धर्मानुसार ही सर्व अशुभतेची प्रतिके आहेत. यामुळे अशा ठिकाणी पुन्हा कोणी वस्ती करण्याचा प्रयत्न केला तर त्यांचा वंश निर्वंश होईल अशी धार्मिक समजुत पुरोहित वर्गाने घालून जनतेच्या मनात दहशत निर्माण केली होती. अशा ठिकाणी बालशिवबांना घेऊन जिजाऊ आल्या. त्यांनी धार्मिक दहशतवादाला भीक न घालता स्वतः त्यांनी लोखंडी पहार काढून फेकली. त्यामुळे लोकांच्या मनात आत्मविश्वास निर्माण झाला. शिवबाच्या हातात सोन्याचा नांगर देऊन पुण्याच्या भुमिला नांगरुन पुण्यभुमी केले. जिजाऊंच्या या धाडसाने लोकांच्या मनातील भिती जाऊन धैर्याने शौर्याने जागा घेतली. जिजाऊने हा शकून-अपशकूनावर केलेला मोठाच लत्ताप्रहार होता. आदिलशहाने शापीत केलेल्या पुण्याच्या (पुनवडी) भुमीला जिजाऊने पुणीत केले. याप्रकारे जिजाऊने मध्ययुगीन काळात समाजसुधारणेचा एक पायंडा घातला. जिजाऊच्या या कृतीमुळे झाले काय? तर लोकांच्या मनात असलेली पाप-पुण्याची भीती नाहीसी झाली. शुभ – अशुभ ही धार्मिक प्रतिके पुरोहितांनी लोकांना भीती दाखविण्याकरिता निर्माण केली आहेत. हे लोकांच्या मनात रूजविण्यात जिजाऊ यशस्वी झाल्यात. हाच जिजाऊंचा निर्भिडपणा , वैज्ञानिक दृष्टीकोन बालवयातच शिवरायांना मिळाला. मावळ्यांच्या अंगी उतरण्यास मदत झाली.
जाती – पातीच्या पलिकडे:- ४०० वर्षांपूर्वी महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण देशाला जातियतेने विळखा घातला होता. भटशाहीने निर्माण केलेल्या जातियतेमुळे माणूस माणसात राहिलेला नाही. आज तंत्रज्ञानाच्या युगात सुद्धा वेळोवेळी जातियतेचे चटके सहन करावे लागत आहेत. चारशे वर्षाआधी काय परिस्थिती असेल याची कल्पना न केलेली बरी. अशा काळात जिजाऊ सह्याद्रीच्या दऱ्या खोऱ्यातील अठरा पगड (शुद्र- अतीशुद्र) जातीच्या मुलांसोबत शिवरायांना खेळू देतात. शिवबाचे सवंगडी म्हणून त्यांना महालात प्रवेश देतात. एकाच पंक्तीत बसवून त्यांना घास भरवितात. त्यांच्या हातात तलवार देऊन मन मनगट मजबूत करून त्यांच्या मनात स्वाभिमान निर्माण करून आत्मविश्वासाने लढण्याचे बळ देतात. हा जातीभेद नष्ट करण्याच्या दिशेने उचललेले त्या काळातील एक मोठचं पाऊल म्हणावे लागेल. तानाजी मालुसरे, शिवा काशिद, मदारी मेहतर, संभाजी जाधव, येसाजी कंक, बाजीप्रभू देशपांडे, नुरखान बेग, दर्यासारंग, जोताजी केसरकर, रायप्पा असे अनेक नावे घेता येतील जे वेगवेगळ्या जाती- धर्माचे होते. जिजाऊने स्वराज्यातील या मावळ्यांना लेकरासारखे पोटाशी धरून माया लावून आईचे प्रेम दिले. स्वराज्याच्या पवित्र कार्यात सहभाग घेतला. हा जिजाऊने जाती – जातीतील भिंती नष्ट करण्याच्या दृष्टीने सूधारणेचा उचलेला एक पाऊल होता. आज विज्ञानयुगात सुद्धा अनेक उच्च शिक्षीत आई वडील आपल्या मुलांना या जातीच्या, त्या धर्माच्या मुलांसोबत मैत्री करू नको. त्या भागातील मुलांसोबत खेळू नको असे सांगून मुलांच्या मनात प्रत्यक्ष जातीभेदाचे बीज रोवण्याचे काम करणारे माय- बाप बघितल्यावर जिजाऊंची त्या काळातील ही कृती किती महान आहे हे आपल्या लक्षात येईल. (आठवा शिवकाळापूर्वी संत ज्ञानेश्वर व त्यांच्या भावंडांचा मनुवाद्यांनी केलेला छळ) उच्च शिक्षीत आणि नौकरदार लोकं तर शहरात प्लाॅट किंवा घर घेतांना शेजारी कोणत्या जाती – धर्माचे लोकं आहेत हे बघून घेतात. किंवा आपल्या शेजारी इतरांना घेऊ देत नाही. आणि टाईमपास चर्चा करतांना म्हणतात आता कुठे जातीयता आहे?
धर्मांतर एक परिवर्तन :- स्वराज्याने चांगले बाळसे धरले होते तेव्हाचा प्रसंग. जिजाऊंच्या थोरल्या सून सईबाई यांचा भाऊ बजाजी निंबाळकर. एका लढाईत मुस्लिम सरदाराच्या तावडीत सापडले. नंतर त्यास मुसलमान करण्यात आले. या बातमीने जिजाऊंना खूप वाईट वाटले. जिजाऊने शिवरायांसोबत चर्चा केली. जिजाऊने बजाजी निंबाळकरांचे शुद्धीकरण करण्यास शिवरायांना सांगितले. .(हिंदू धर्मात पुन: प्रवेश /घर वापसी) ज्या काळात शुद्धीकरणाची कल्पना सुद्धा सहन होत नव्हती. पुरोहित वर्गाने धर्म बुडाला म्हणून गहजब केला असता. अशा काळात जिजाऊ धर्मात पुन: प्रवेशाचा पायंडा घालण्याचा विचार करत होत्या. हे सनातन्यांच्या दृष्टीने खूप मोठे पाप. हिंदू धर्माचा विचार केल्यास कदाचित हिंदू धर्म सोडून गेल्यानंतर पुन्हा धर्मात प्रवेश देण्याची कदाचित ही पहिलीच वेळ असावी. आणि त्याची सुरुवात करणार होत्या जिजाऊ. शिवरायांच्या हस्ते. जिजाऊ स्वतः शिखरशिंगणापूरला गेल्या. बजाजीला घेतलेला निर्णय सांगितला. बजाजीने जिजाऊंचे आभार मानले आणि त्यांच्या पायावर डोके ठेवले. शिखरशिंगणापूरच्या भूमितच बजाजीचे शुद्धीकरण करून हिंदू धर्मातील एका नव्या सुधारणेला जिजाऊने सुरूवात केली. . ज्या हिंदू धर्माने स्त्रीला तुच्छ लेखले होते. त्याच धर्मातील धर्म शुद्धीकरणाची सुरूवात जिजाऊ नावाच्या स्त्रिने केली. पुढे शिवाजी महाराजांनी नेताजी पालकरांच्या बाबतीत हाच कित्ता गिरवला. भारताच्या इतिहासात अनेक कर्तृत्ववान स्त्रिया झाल्यात जिजाऊ एवढी धोरणी , खंबीर, प्रगतीशील, पुरोगामी विचारांची महान स्त्री सापडणे कठीण. कारण चारशे वर्षांपूर्वी सनातनी कर्मठ महाराष्ट्रात शुद्धीकरणाचे कार्य करण्याचे धाडस कोणालाही झाले नसते.
आज जिजाऊ असत्या तर : – काल – परवालाच नागपूर येथे भारतीय विज्ञान काँग्रेस चे अधिवेशन बोलवीण्यात आले होते. त्यातील इंडियन विमेन्स काँग्रेसच्या चर्चासत्रात अवैज्ञानिक व अंधश्रद्धेला खतपाणी घालणारी मांडणी दोन स्त्रियांनी केली. एकीने हळदी – कुंकवाचे महत्व सांगितले तर दुसरीने घराबाहेर रांगोळी काढल्याने दुष्ट शक्ती घरात येत नाही असे म्हणत अक्कलेचे तारे तोढले. वर्तमान काळात उच्च शिक्षित म्हणवणाऱ्यांचा मेंदू जर असा बुरसट विचार करून समाजात अंधश्रद्धा पसरवत असेल तर सामान्यांचे काय? आज जिजाऊ नाहीत हॆ वास्तव आहे. परंतु त्या असत्या तर त्या विज्ञान काँग्रेस मधील शास्त्रज्ञाच्या मेंदूना आग लावली असती. ज्या विचारांमुळे किंवा कार्यामुळे अंधश्रद्धा वाढेल अशा विचारांना जिजाऊने कधीही जवळ फिरकू दिले नाही. त्यांनी विचारांच्या आणि प्रयत्नाच्या बळावर शिवबाचे आणि मावळ्यांचे मन – मेंदू आणि मनगट सशक्त आणि मजबूत केले. म्हणूनच शिवाजी महाराजांचा दुसरा मुलगा राजाराम पालथा जन्माला आल्यावर त्यास शुभ – अशुभ न मानता त्यांच्या जन्माचे स्वागत केले. शिवाजी महाराजांनी शत्रूवर जेवढे म्हणून आक्रमण केले ते आमवास्येच्या रात्री केले. ही सर्व प्रेरणा त्यांना जिजाऊंच्या विचारामुळे आली होती. आज गरज आहे, वर्तमानातील स्त्रि – पुरुषांनी जिजाऊंच्या विचार – कार्याचे अनुकरण करण्याची.
जिजाऊने ४०० वर्षाआधी ज्या सुधारणेचा – परिवर्तनाचा पायंडा घातला त्याचे कौतुक केल्याशिवाय रहावत नाही. त्यांनी सामाजिक व धार्मिक सुधारणां बरोबरच जाती – जातीतील, घरा – घरातील होणारे भांडणे सोडविले. लोकांच्या हातांना काम देवून लोकांच्या आर्थिक प्रगतीस मोठाच हातभार लावला. जिजाऊ स्वतः धर्मनिष्ठ, परंपराप्रिय होत्या परंतु अंधश्रद्धाळू नव्हत्या, सनातनी विचारांच्या नव्हत्या. त्यांनी कायम नव विचारांचा स्वीकार करून प्रजेस सुद्धा स्वीकारावयास लावला होता.
या देशात अनेक समाजसुधारक झालेत त्यामुळे परिवर्तन सुद्धा झालेत. परंतु एका राजघराण्यातील राणीने, राजमातेने समाजसुधारणा करणारे पात्र इतिहासात क्वचितच सापडणार. समाजसुधारणेचा जिजांऊचा हा आदर्श नंतरच्या राज्यकर्त्यांनी, समाजसेवकांनी गिरवला असता तर भारत प्रगत भारत म्हणून याआधीच पुढे आला असता.
संकलन — अनिल भुसारी
तुमसर, जि. भंडारा