दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
▪️ शेतकऱ्यांचा ४९ वर्षा अगोदरचा इतिहास अजूनही जीवंत
▪️शेतकऱ्यांच्या जीवनातील काळा दिवस २४ जानेवारी हा दिवस स्मृतिदिनी होणार साजरा
—————————————-
अमरावती :- बहिरम यात्रेदरम्यान शेतकऱ्यांनी कापूस सत्याग्रह आंदोलनातून एकाधिकारशाही विरोधात उठवलेल्या आवाजामुळे भारत देशाच्या अन्नदात्याचे रक्त सांडल्याचा इतिहास आजही विसरता येणार नाही.सन १९७० साली महाराष्ट्र शासनाने कापूस एकाधिकार योजना सुरू केली होती.यामध्ये शेतकरी वर्गाचा फायदा होण्याऐवजी शेतकरी वर्ग अधिकच तुटला आणि संघर्षाची ठिणगी पडली.
आज ४९ वर्ष उलटून सुद्धा बहिरम यात्रेदरम्यान अंजनगाव सुर्जी-दर्यापूर-चांदूरबाजार-अचलपूर-परतवाडा-चिखलदरा तालुक्यातील शेतकऱ्यांनी स्व.दादासाहेब हावरे,स्व.शंकरराव बोबडे,स्व.भाऊ साबळे,स्व.मामराज खंडेलवाल,स्व.विनायकराव कोरडे आदींच्या नेतृत्वातील महाराष्ट्र शासनाने राज्यात एकाधिकार योजनेविरुद्ध आंदोलन उभारले होते.
महाराष्ट्र शासनाने राज्यात कापूस एकाधिकार योजना राबवली होती.त्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी नाडला जाऊ लागला होता.त्यावेळी महाराष्ट्र व मध्यप्रदेश च्या सीमावर्ती परिसरातील क्षेत्र बहिरम येथे आंदोलनाकरिता जागा निवडल्या गेली.यावेळी बहिरम यात्रा सुद्धा भरली होती.हे ऐतिहासिक शेतकरी आंदोलन इतके व्यापक होते की बंदोबस्तात असलेल्या पोलीस यंत्रणेलाही आंदोलन आवरता आले नाही.त्यामुळे पोलीसांनी आंदोलन करता शेतकऱ्यांवर सुरुवातीला अशुधुरांच्या नळकांड्या सोडल्या त्यानंतर लाठीमार केला.शेतकरी अधिकच आक्रमक झाल्याने तत्कालीन पोलीस अधीक्षक सुधीर कुमार यांच्या आदेशाने आंदोलनकारी शेतकऱ्यांवर गोळीबार करण्यात आला.त्यात अचलपूर तालुक्यातील पथ्रोट येथील वृद्ध शेतकरी विठ्ठलराव दोतोंडे पोलीस गोळीबारात शहीद झाले होते;तर करजगाव येथील भीमराव बनसोड यांना गोळी लागल्याने गंभीर जखमी झाले त्यानंतर त्यांच्यावर तब्बल एक वर्ष नागपूरच्या रुग्णालयात उपचार सुरू होते आणि अमृतराव टवलारे यांना लाठी व छऱ्याचा मारा लागला होता.या ऐतिहासिक कापूस सत्याग्रह शेतकरी आंदोलनातील विठ्ठलराव दोतोंडे हे पहिले शहीद शेतकरी होते.
महाराष्ट्र व मध्य प्रदेश सीमेवर बहिरम तीर्थक्षेत्र येथे आजूबाजूच्या तालुक्यातील शेतकऱ्यांनी शासनाच्या कापूस धोरणा विरोधात रणसिंग फुंकले या आंदोलनात सुमारे पाच हजार शेतकऱ्यांनी दीड हजार कापसाने भरलेल्या बैलगाड्या बहिरमात आणल्या होत्या.ह्या कापूस सत्याग्रह आंदोलनात पोलीसांच्या चकमकीत ५० पेक्षा अधिक शेतकरी गंभीर जखमी झाले होते.त्यामुळे २४ जानेवारी १९७५ हा दिवस आजूबाजूच्या तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी काळा दिवस ठरला.असे ऐतिहासिक आंदोलन आजपर्यंत झाले नाही.या आंदोलनातील नेत्यांना तुरुंगवास झाला.या आंदोलनाची आठवण म्हणून प्रकाश साबळे यांचे पुढाकाराने दरवर्षी दि.२४ जानेवारी रोजी शहीद शेतकरी स्मृतिदिन साजरा करण्यात येतो. या प्रसंगी शेतकऱ्यांनी,आंदोलनातील शेतकरी पुत्रांनी,नातेवाईकांनी प्रामुख्याने हजर रहावे.अशी विनंती आयोजक विदर्भकुमार बोबडे,प्रकाश साबळे,मनीष हावरे,गोपाल भालेराव आदिंनी केली आहे.


