
दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी:-संतोष मनधरणे
देगलूर प्रतिनिधी:
सीसी टीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीमुळे सध्या असंख्य छोटे- मोठे गुन्हे उघडकीस येत आहेत. पन देगलूर शहरात देखील सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत; परंतु आज घडीला त्यातील बहुतांश कॅमेरे बंद पडल्यामुळे देगलूर शहराची सुरक्षा व्यवस्था वाऱ्यावर सोडले आहे असे दिसत आहे.
देगलूर हे महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा राज्याच्या सीमेवर वसलेले अत्यंत महत्त्वाचे शहर आहे. एका अर्थाने उत्तरेतून दक्षिणेत आणि दक्षिणेतून उत्तरेत जाण्यासाठीचे हे प्रवेशद्वार आहे. शीख बांधवांचे पवित्र क्षेत्र नानक झीरा अर्थात बिदरचा गुरुद्वारा आणि नानक झरा दर्शनास जाण्यासाठी जगभरातून लाखो भाविक वर्षभर याच मार्गाने ये- जा करतात. शहरात सुप्रसिद्ध गुंडा महाराज मठ, रफाई दर्गा अशी महत्त्वाची धार्मिक स्थळे आहेत. शहरापासून जवळच हेमाडपंथी मंदिर असलेले होट्टल हे ऐतिहासिक परंपरा लाभलेले स्थळ आहे. शहरातील सराफा मार्केट, भांडी मार्केट, कापड मार्केट, मशिनरी मार्केट प्रसिद्ध आहे. शहराची व्याप्ती खूप मोठी असून नांदेड- देगलूर रोडवरील लेंडी नदीपात्रापासून रामपूर गावाच्या सीमेपर्यंत आणि पूर्वेला नरंगल रोडवरील वस्तीपासून देगाव- भायेगावच्या सीमेपर्यंत शहर पसरले आहे. शहराची अंदाजे ते लोकसंख्या 74 हजार सांगितली जात असली तरी प्रत्यक्षात जवळपास एक लाख लोक शहरात वास्तव्यात असून दिवसेंदिवस ही लोकसंख्या वाढत आहे. वार्ड पुनर्रचनेपूर्वी शहराची एकूण वार्ड संख्या 24 होती. देगलूर शहराच्या सुरक्षेसाठी पोलीस ठाण्याबरोबरच एक विभागीय अधिकारी (डीवायएसपी) कार्यालय, उपजिल्हाधिकारी कार्यालय, न्यायालय, तहसील कार्यालय, पंचायत समिती, उपजिल्हा रुग्णालय, तीन वरिष्ठ महाविद्यालये, कनिष्ठ महाविद्यालये, हायस्कूल, प्राथमिक शाळा, नगरपरिषद कार्यालय, सार्वजनिक बांधकाम विभाग, पशुवैद्यकीय दवाखाना, तालुका कृषी कार्यालय, गटशिक्षणाधिकारी कार्यालय आदी अनेक शासकीय- निमशासकीय कार्यालये असून हे शहर नांदेड जिल्ह्यातील नांदेड शहरानंतर दुसरे महत्त्वाचे शहर म्हणून ओळखले जाते. या शहराच्या सुरक्षेसाठी पोलीस यंत्रणेच्या मदतीला शहराच्या विविध भागात एकूण 84 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत.या कॅमेऱ्यांच्या लोकार्पणानंतर देखभाल दुरुस्तीचे काम नगर परिषदेकडे आहे तर मॉनिटरिंग देगलूर पोलीस ठाण्यात आहे; परंतु ‘नव्याचे नऊ दिवस’ या म्हणीप्रमाणे सुरुवातीला या सीसीटीव्ही कॅमेऱ्याची देखभाल दुरुस्ती केली जात होती; परंतु हळूहळू या कॅमेऱ्यांच्या देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे या सीसीटीव्ही कॅमे-यांपैकी जवळपास 80 ते 90 टक्के कॅमेरे बंद आहेत. गेल्या कांही महिन्याच्या काळात शहरात गळ्यातील साखळी चोरी, दुचाकीची चोरी, हायवा चोरी, अडत, किराणा दुकान, सर्वसामान्य नागरिकांच्या घरात चोरीचे प्रमाण वाढले आहे. एका व्यावसायिकाची दोन लाख रुपयांची बॅग पळविण्यात आली. शहराच्या विविध भागात घरपोडीचे प्रकार अधून मधून घडत आहेत. सीसीटीव्ही कॅमेरे सुरू असते तर पोलिसांना गुन्हेगारांचा शोध घेण्यास मदत झाली असती. एवढेच नव्हे तर शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस जवळ व परिसरात घडणारे अपप्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाले असते. पोलिसांनी त्या प्रकाराची गंभीर दखल घेऊन कार्यवाही केली असती आणि अपप्रवृत्तीवर आळा बसला असता; परंतु गेल्या कांही महिन्यांपासून बहुसंख्य सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्यामुळे गुन्हेगारी कृत्यात वाढ झाली आहे.मध्यरात्रीनंतर सुरू होणारी अवैध रेती वाहतूक,अवैध मुरूम उत्खनन आणि वाहतुकीसह सुरू असलेले अनेक अवैध धंदे पोलिसांनी बंद पाडू शकले असते ह्या सीसीटी कॅमेऱ्या कडे जाणून बुजून दुर्लक्ष पोलीस प्रशासन करत आहे का असे कुठेतरी जनतेत प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे ? तरी पोलीस प्रशासनाने देगलूर शहराच्या सुरक्षिततेसाठी उच्च क्षमता असलेले नवीन सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत अशी जनतेतून मागणी केली जात आहे.