
दैनिक चालू वार्ता उपसंपादक परभणी- दत्तात्रय वामनराव कराळे
परभणी : राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सल्लामसलत करुन त्यांनी सोपवलेल्या यादीतील नावांना राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे लवकरच मान्यता देतील असे विश्वसनीय सुत्रांकडून समजते आहे. त्यामुळे बऱ्याच कालावधीपासून प्रलंबित असलेला हा प्रश्न निकाली निघू शकेल एवढे मात्र खरे.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नुकतेच मुंबई दौऱ्यावर विविध विकास कामांच्या उद्घाटन निमित्ताने येऊन गेले त्यावेळी भगतसिंग कोश्यारी यांनी पंतप्रधान यांना एका निवेदनाद्वारे जबाबदारीतून मुक्त करण्याची विनंती केली आहे. मी यापुढे चिंतन मनन करणार असल्याचेही त्यांनी त्या निवेदनात म्हटले आहे. त्याच अनुषंगाने प्रलंबित राहिलेला १२ राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या नावांना अनुमती देऊन तो प्रश्न निकाली काढला जाईल अशी दाट शक्यता आहे. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचेशी चर्चा करुन त्या नावांना मान्यता व सदस्य नियुक्तीचा कार्यक्रम सुध्दा याच आठवड्यात पार पाडला जाईल असे दिसतेय. कारण आगामी १५ दिवसांच्या आतच भगतसिंग कोश्यारी यांना मुक्त केले जाऊन त्या जागेवर शिंदे सरकारला पुरक व प्रेरक ठरु शकतील अशाच व्यक्तीला त्या ठिकाणी स्थानापन्न केले जाईल असे दिसतेय. तीन मान्यवर व्यक्तींची चाचपणी दिल्ली दरबारी होत असून त्यापैकी एकाला संधी दिली जाऊन महाराष्ट्रात मागील काही कालावधी पासून थोर नेत्यांच्या अपमानाविषयीचे कोश्यारी यांनी उठवलेले वादळ ही शमले जाणार आहे.
दरम्यान संभाव्य राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांमध्ये शिंदे गट व भाजपाला समसमान जागा मिळाल्यास शिंदे गटातील अनेक ज्येष्ठ नेत्यांना त्यात संधी मिळू शकेल ज्यामुळे त्यांची सरकार पक्षात बऱ्यापैकी ताकद वाढली जाणार आहे एवढे नक्की.
रामदास भाई कदम, आनंदराव अडसूळ यांच्यासह अशा कांही नेत्यांना संधी दिली जाईल, त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची राजकीय शक्ती अधिक बळकट बनली जाईल.