
दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती :- शहरात गुरुवार, दि.२६ जानेवारी २०२३ रोजी प्रजासत्ताक दिनाच्या ७३ वा वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळेतील लहान मुले,पालक तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी यांच्या वाहनांची रस्त्यावर फार मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. अशावेळी वाहतुकीची कोंडी होवून अपघातासारखा अनुचित प्रकार घडू नये तसेच सार्वजनिक शांतता भंग होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी वाहतूक व्यवस्थेत तात्पुरते बदल करण्यात आले आहेत.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून अमरावती शहरातील सर्व हलक्या व जड वाहनांची वाहतुक नियंत्रित करण्यासाठी पोलीस उपायुक्त सागर पाटील यांनी मुंबई पोलीस कायदा १९५१ चे कलम ३३ (१)(ब) तसेच मोटार वाहन कायदा १९८८ चे कलम ११५ अन्वये आदेश निर्गमित केला आहे.
यानुसार ,गुरुवार, दि.२६ जानेवारीच्या रात्री १२ वाजेपर्यंत शहरातील सर्व प्रकारचे मालवाहू हलकी व जड वाहने यांना शहरात सर्व बाजूने प्रवेश बंदीचे आदेश पारित करण्यात आले आहेत.
तसेच शहरातील गाडगेनगर समाधीपासून ते शिवाजी शिक्षण संस्था व नेहरु स्टेडिअमकडे येणारा उड्डाणपुल,इर्विन चौक ते राजापेठ पोलीस स्टेशन तसेच कुथे हॉस्पिटल ते नंदा मार्केट आणि कुशल ऑटोकडे जाणाऱ्या उड्डाणपुलावरुन गुरुवार,दि.२६ जानेवारी रोजी सकाळी 6 ते रात्री १२ वाजेपावतो आवागमन करणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंदीचे आदेश पारित करण्यात आले आहे.
या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्याविरुध्द मोटार वाहन कायदा १९८८ व मुंबई पोलीस कायदा १९५१ नुसार कार्यवाही करण्यात येईल,असे पोलीस उपायुक्त (मुख्यालय) सागर पाटील यांनी कळविले आहे.