
दैनिक चालु वार्ता जालना प्रतिनिधी-आकाश माने
जालना जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. दारूच्या नशेत डोक्यात दगड घालून पत्नीची हत्या केल्यानंतर पतीनं विषारी औषध घेतले. पळसखेड मूर्तड येथे ही घटना घडलीये. सध्या पतीवर उपचार सुरू आहेत.
पळसखेडा मूर्तड येथील सोनवणे हे परिवारासह तालुक्यातील वरुड शिवारात राहत होते. पतीला दारूचे व्यसन जडल्याने घरात नेहमी वादविवाद होत होते. बुधवारी पत्नी मुलांसह अंगणात गहू वाळवत असतांना दारू पिऊन आलेल्या पतीने मी सांगितलेली पट्टी का घेतली नाही असं म्हणत या कारणाहून पत्नीसोबत वादावाद सुरू केला.
त्यांच्यातील वाद विकोपाला गेल्यानंतर दारूच्या नशेत असणाऱ्या पतीने त्याच्या पत्नीच्या डोक्यात दगड घातला. घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाला. जखमी अवस्थेत पत्नीला सिल्लोड येथे खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तेथील डॉक्टरांनी तपासुन त्यांना मृत घोषित केले. या घटनेनंतर आज सकाळी पतीने विषारी औषध प्राशन केले.
त्याला उपचारासाठी भोकरदन ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे नातेवाईकांनी सांगितले. दरम्यान मयत महिलेचा भाऊ संजय गावंडे यांच्या तक्रारीनुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस या घटनेत अधिक तपास करत आहेत.