
दैनिक चालु वार्ता जव्हार प्रतिनिधी-दिपक काकरा.
जव्हार:तालुक्यात गेल्या दोन दिवसापासून ढगाळ वातावरण तयार होऊन सलग दोन दिवस झालेल्या अवकाळी पावसाने शेतकरी हैराण झाला आहे.दरम्यान वादळी वाऱ्यासह बेमोसमी पाऊस झाल्याने रब्बी हंगामातील शेतकऱ्यांना याचा मोठा फटाका बसला आहे.ढगांच्या गडगडाटासह झालेल्या पावसामुळे नागरिकांची एकच धावपळ उडाली.अवकाळी पाऊस झाल्याने उष्णतेने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळून वातावरणात कमालीचा गारवा निर्माण झाला.परंतु या वादळी वारा व पावसामुळे आंबा,काजू अशा फळबागांचे मोठे नुकसान होऊन शेतकऱ्यांच्या हाताशी आलेल्या पिकांचे नुकसान होऊन शेतकऱ्यांना याचा जबर फटका बसला आहे.नुकसान झालेल्या शेतीचे तत्काळ पंचनामे करून मदत देण्याची मागणी शेतकऱ्याकडून केली जात आहे.दरम्यान ज्या लोकांनी घराचे दुरुस्तीचे बांधकाम चालू केले होते त्यांची मात्र मोठी तारांबळ उडाली होती.उघड्या घरांना प्लास्टिकचा आधार द्यावा लागला तर गवतांच्या घरांचे ही मोठे नुकसान झाले तर वीटभट्टीना मोठा फटका बसला.