
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा –
मुंबई, दि. 8: राज्यात विविध भागात अवकाळी पाऊस, गारपिटीने उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे काढणीला आलेला कांदा, गहू, हरभरा, सोयाबीन, मका, तूर, केळी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे, तरी नुकसानीचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी विधान सभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सभागृहात केली.
विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले, गेल्या दोन दिवसात नाशिक, धुळे, बुलडाणा, पालघर, बीड, जालना, पुणे, अहमदनगर, वाशिम, सोलापूर व राज्यातील इतर भागात मोठ्या प्रमाणात अवकाळी पावसाने काढणीला आलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे काढणीला आलेला कांदा, गहू, हरभरा, सोयाबीन, मका, तूर, केळी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच कापणीला आलेला गहू जमिनदोस्त झाला आहे, आंबा, काजू, द्राक्षे, केळी, संत्रा, लिंबू, पपई, कलिंगड यासारख्या अनेक फळपीकांबरोबरच हरभरा, तूर, मका, वाल, चवळी, पावटा व इतर रब्बी पालेभाज्या यांचेही नुकसान झालेले आहे. वीज अंगावर पडून जनावरे दगावली आहेत, मेंढ्यासुद्धा मृत झाल्या आहेत. शेतकरी दुहेरी आर्थिक संकटात सापडला आहे आंबा, काजू सारख्या पिकांचा मोहोर, व संत्रा लिंबू यांची फळे गळल्याने उत्पादनावर विपरीत परीणाम होणार आहे. शेतकरी दुहेरी अडचणीत सापडल्याने सरकारने या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली.